
Kalyan News : दहा तासांच्या संघर्षानंतर अखेर दफनविधी; केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर तणाव निवळला
Kalyan News : दफनविधीसाठी कब्रस्तानांकडून परवानगी नाकारण्यात आल्याने निर्माण झालेला तणाव अखेर दहा तासांच्या संघर्षानंतर निवळला. वसीमुनिसा काझी यांच्या पार्थिवावर कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) दफनभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले.
वसीमुनिसा काझी या गेल्या काही काळापासून कोमामध्ये होत्या. मंगळवारी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. त्यानंतर कुटुंबीयांनी दफनविधीची तयारी सुरू केली. सुरुवातीला ते उल्हासनगर येथील कब्रस्तानात गेले. मात्र, संबंधित महिला आमच्या हद्दीत राहत नसल्याचे कारण पुढे करत कब्रस्तान व्यवस्थापनाने दफनविधीस परवानगी नाकारली. त्यामुळे आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला.
यानंतर कुटुंबीयांनी कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तान गाठले. मात्र, तेथेही हद्दीचे कारण देत दफनविधीस नकार देण्यात आला. एका कब्रस्तानातून दुसऱ्या कब्रस्तानात धावपळ करूनही दफनविधीची व्यवस्था होत नसल्याने कुटुंबीय संतप्त झाले. मृत व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठीही हद्दीचे निकष लावले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली.
मोहोने परिसरातील रहिवाशांसाठी टिटवाळा येथे दफनभूमीची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या दफनभूमीवर भूमाफियांनी कब्जा केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मोहोने परिसरातील नागरिकांना दफनविधीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा पुन्हा समोर आला.
या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी वसीमुनिसा काझी यांचे पार्थिव थेट महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी प्रेम ऑटो परिसरातच त्यांना अडवले. यानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Navi Mumbai News: बुलेटच्या फटाक्यांसारख्या आवाजाने नवी मुंबईकर हैराण; बेकायदा सायलेन्सर बसवणाऱ्या गॅरेजवर धाडी टाकण्याची मागणी
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी कुटुंबीय, पोलीस, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी यांच्यात सुमारे तीन तास चर्चा सुरू होती. मोहोने परिसरातील नागरिकांच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
अखेर केडीएमसी आयुक्त लवकरच संबंधित विषयावर बैठक घेतील आणि दफनभूमीच्या प्रश्नावर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करतील, असे लेखी आश्वासन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर निर्माण झालेला तणाव निवळला आणि वसीमुनिसा काझी यांच्या पार्थिवावर कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानात दफनविधी पार पडला.
यावेळी काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंह, ठाकरे गटाचे रुपेश भोईर, महापालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Diva News: दिव्यातील डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग; विषारी धुरामुळे दिवेकरांच्या आरोग्याला धोका!
मात्र, या संपूर्ण प्रकरणामुळे मोहोने परिसरातील नागरिकांच्या दफनभूमीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दफनविधीस नकार देणाऱ्या कब्रस्तान व्यवस्थापनावर काही कारवाई होणार का? टिटवाळा येथील दफनभूमीवरील कथित अतिक्रमण कधी हटवले जाणार? तसेच मोहोने परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी दफनभूमीची सुविधा कधी उपलब्ध होणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Ans: कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.
Ans: दफनविधीसाठी कुटुंबीयांना सुमारे दहा तास संघर्ष करावा लागला.
Ans: संबंधित महिला त्या कब्रस्तानांच्या हद्दीत राहत नसल्याचे कारण देत व्यवस्थापनाने दफनविधीस परवानगी नाकारली.