गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने यावर्षी तालुक्यात टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तालुक्यात सावर्डे, टेरव आणि कादवड ग्रामपंचायतीने गावातील पाणीटंचाईच्या कारणास्तव टँकर सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टँकरची मागणी होत असली तरी अद्याप टंचाईग्रस्त सावर्डे आणि टेरवला टँकर सुरू झालेला नाही. लवकरच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत गावोगावी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या असल्या तरी पाणीटंचाई संपुष्टात आलेली नाही. तालुक्यातील पूर्व विभागातील अनेक गावांना टंचाईचा तडाखा बसत आहे. तीन वर्षांपूर्वी तिवरे धरण फुटले. अद्याप त्याची उभारणी झाली नसल्याने तिवरे नदीवर अवलंबून असलेल्या गावांनाही टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गतवर्षी तालुक्यातील टंचाईग्रस्त १७ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.
यामध्ये अडरे, कामथे खुर्द, कोसबी, नारदखेरकी, रिक्टोली, कळकवणे, कळंबट, नांदगाव खुर्द, तिवडी, निवळी, शिरवली, सावर्डे, कादवड, गाणे, ओवळी, आकले व येगाव या गावांतील काही वाड्यांचा टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये सर्वाधिक धनगरवाड्यांचा समावेश होता. ९ गतवर्षी तालुक्याचा टंचाई आराखडा ७१.६० लाख तर यावर्षी आराखडा पावणेतीन कोटींवर पोहोचला आहे.
यावर्षीच्या आराखड्यात टंचाईग्रस्त गावातील विंधन विहिरीत आडव्या बोअरवेल मारण्यावर भर देण्यात आला आहे. डेरवण धरणात पाणी नसल्याने सावर्डेला भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. आमदार शेखर निकम यांच्याच गावात लोकांना टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यासाठी आमदार निकम यांनी डेरवण धरण दुरुस्तीसाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला असून, मे महिन्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे. टेरव येथील जलजीवनची पाणी योजना अर्धवट राहिली. त्यामुळे पूर्ण गावाला टंचाईच्या झळा बसत आहेत. कादवड येथील दोन्ही धनगरवाड्यांना पाण्याची समस्या निर्माण झाल्याने टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे.