बावडा / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : इंदापूर तालुक्यात रस्ते, विज, पाणी अशा मूलभूत निकडीच्या गरजा जवळपास पूर्ण झाले आहेत. आता इंदापूर तालुक्यातील शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
बावडा परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण आदी कार्यक्रम पार पडल्यानंतर येथील बाजार तळ प्रांगणात शुक्रवारी रात्री जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी भरणे बोलत होते. पुढे ते म्हणाले, मी काम करताना जात-पात पक्ष नातीगोती न पाहता माझ्या परीने लोकांची कामे करतो. विरोधक मात्र आमच्यावर नाहक टीका करत आहेत. त्यांना आता दुसरे कामच उरले नाही. २२ गावच्या पाणी प्रश्नावरून सोलापूरच्या लोकांना भडकविण्याचे काम विरोधकांनी केले. मात्र, काही झाले तरी इंदापूर तालुक्यातील हक्काचे पाणी शेतीला मिळवून देणारच असे ते म्हणाले.
विरोधक एकाच कामाचे चार-पाच वेळा नारळ फोडत असत, आपण मात्र ६९ कोटी दिले पण नारळ फोडण्याचा हा व्यास कधी केला नाही. जाती-पातीत भांडणे लावून स्वतःची पोळी भाजण्याचे काम केले. यापुढील काळात काम करणाराच नेता टिकणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका केली. पंचवीस वर्षांपूर्वी मी घसा तोडून सांगत होतो ते आता सर्वांना पटले. याचे मला समाधान वाटत आहे. विरोधकांनी नीरा-भीमा व कर्मयोगी या दोन्ही साखर कारखान्याच्या ऊसाची रिकव्हरी कमी दाखवण्यात आली. त्यामुळे ऊस बिल हे कमी होऊन शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला. ते ही बिले चार चार महिने बिले थकविले आहे.
आता त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी भाजपा पक्षावरही कडाडून टीका केली. हीच भाजप संपल्यावर हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये च येऊन बसतील. जाती-पातीचे राजकारण संपले असून ही धारही बोथट झाली आहे.
यावेळी माजी सभापती प्रशांत पाटील म्हणाले, मी पंचायत समितीचा सभापती असताना विरोधकांनी मला नीट काम ही करू दिले नाही. व माझी नेहमीच गळचेपी केली. त्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील म्हणतात मी त्यांना सभापती केले, मी जेव्हा सभापती होतो त्यावेळेस ते स्कूल मध्ये होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, जी.प. माजी सदस्य श्रीमंत ढोले यांनीही हर्षवर्धन पाटलांवर सडकून टीका केली.
फडणवीसांचे आभार…!
नीरा नरसिंगपूरचा विकास आराखडा करताना मी आमदार होतो. हर्षवर्धन पाटील तुम्ही नव्हता. बावडा – नरसिंहपूर रस्त्यासाठी ५७ कोटींचा निधी विधानसभेत पाठपुरावा करून आणला त्यामुळेच हा रस्ता झाला आहे. त्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माझे कौतुक केले होते. त्याबद्दल फडणवीस यांचे आभार मानतो.