सौजन्य : iStock
चंद्रपूर : वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या मॅनेजरने दारू पिऊन क्षुल्लक कारणावरून एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.14) रात्री दुर्गापूर येथील खुल्या कोळसा खाणीत घडली. यात सुदैवाने कर्मचारी हा बचावला असून, त्याच्यावर वेकोलिच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे मॅनेजर जरपला बालकृष्ण यांच्यावर दुर्गापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माईनिंग सरदार संकल्प कुंभारे असे जखमीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास बी रिलेमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर जरपला बालकृष्ण या अधिकाऱ्याने कामावरून निघालेल्या संकल्प कुंभारे या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यामुळे कर्मचारी जखमी झाला असून, त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती क्षणार्धात संपूर्ण परिसरात पोहोचली. त्यामुळे खदान परिसरात अधिकारी, कामगार आणि कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने अधिकारी घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, कामगार संघटनांनी त्याचे हे प्रयत्न हाणून पाडले.
अधिकाऱ्याने पळ काढण्याच्या उद्देशाने गाडीच्या चालकाला घटनास्थळावरून गाडी समोर घेण्याचे सांगितले असता त्यांच्या वाहनाने अपघात होता होता वाचला. अधिकाऱ्याला तेथील काही कामगारांनी पकडले. ज्या अधिकाऱ्याकडून हा प्रकार घडला तो घटनेच्या वेळी मद्यप्राशन करून असल्याचे समजते.
या घटनेनंतर वेकोलि व्यवस्थापनाने त्या अधिकाऱ्याला खासगी रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कर्मचारी संघटनेच्या दबावामुळे त्या अधिकाऱ्यालाही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास दुर्गापूर पोलिस करीत आहेत.