
Jeffrey Epstein सह मोदींचा नक्की संबं(ध काय? (फोटो सौजन्य - X.com/Instagram)
एपस्टीनशी संबंधित ई-मेल्समध्ये भारतातील काही बड्या व्यक्तींची नावे आढळून आली असल्याचे सांगताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार अधिकारी स्टीव्ह बॅरेन यांनी एपस्टीनला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये भारताच्या पंतप्रधानांची भेट घडवून देण्याची विनंती केली होती. त्यावर एपस्टीनने ‘मोदी भेटायला तयार आहेत’ असे उत्तर दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे मोदी आणि एपस्टीन यांचे नेमके काय नाते होते? की एपस्टीन हा पंतप्रधानांसारख्या व्यक्तींच्या भेटी सहज घडवून देऊ शकत होता? याचे उत्तर मिळायला हवे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एपस्टिनबाबत माहिती
चव्हाण यांनी पुढे सांगितले की, एपस्टीनने जवळपास ३० वर्षांच्या काळात अल्पवयीन मुलींबाबतचे फोटो, व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्ड, ई-मेल्स आणि पत्रव्यवहार गुप्तपणे जमा केला होता. हा सुमारे ३०० गिगाबाईट इतका प्रचंड डिजिटल पुरावा अमेरिकेतील न्यायालयात सादर करण्यात आला होता.
या प्रकरणावर जनतेच्या दबावामुळे अमेरिकेच्या यूएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी ‘Epstein File Transparency Act’ हा कायदा १९ नोव्हेंबर रोजी मंजूर केला. या कायद्यानुसार ३० दिवसांच्या आत सर्व कागदपत्रे सार्वजनिक करणे बंधनकारक करण्यात आले. परिणामी, १९ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात माहिती प्रसिद्ध झाली. ही माहिती इतकी व्यापक आहे की, तिचे संपूर्ण विश्लेषण करण्यास अनेक आठवडे लागतील, असे अमेरिकन प्रशासनानेही मान्य केले आहे.
काय आहे नक्की प्रकरण
या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो व व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला असून, भारतीय वंशाचे खासदार रो खन्ना यांनी काही पुरावे दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. याच प्रकरणात भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव एका ई-मेलमध्ये आढळते. तसेच उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव या प्रकरणात आहे. याशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका आरोग्यविषयक तज्ज्ञाचाही उल्लेख या फाईल्समध्ये आहे. हरदीप पुरी हे न्यूयॉर्कमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक वेळा समोर येत असला तरी, याबाबतची सर्व कागदपत्रे मी अद्याप पाहिलेली नसल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले.
भारतीय नागरिकांचादेखील सहभाग असल्याची शंका
चव्हाण पुढे म्हणाले, या फाईल्समध्ये अल्पवयीन मुलींच्या साक्षी, सीसीटीव्ही फुटेज, पोलिस तपासातील पुरावे आणि आर्थिक व्यवहारांचा उल्लेख आहे. प्रत्येक मुलीला १००० डॉलर्स देण्यात आल्याचा तपशीलही त्यात आहे. जर या प्रकरणात भारतीय नागरिकांचा सहभाग आणि बाल लैंगिक शोषण सिद्ध झाले, तर जगातील कोणत्याही देशात घडलेला गुन्हा असला तरी, भारतीय दंड विधानानुसार त्या व्यक्तीला भारतातही शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात काही भारतीयांची नावे समोर आली असली, तरी त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे, असे सध्या म्हणता येणार नाही, असेही चव्हाण यांनी नमूद केले. मात्र, एपस्टीनसारख्या व्यक्तीशी त्यांचे संबंध कसे आले, हा प्रश्न गंभीर आहे, असे ते म्हणाले.
मोदींचा संदर्भ २०१४ चा
एपस्टीनला २००८-०९ मध्येच शिक्षा झाली होती आणि तो देहव्यापार करणारा विकृत प्रवृत्तीचा गुन्हेगार असल्याचे जगाला माहीत होते. तरीही २०१४ साली मोदींचा संदर्भ या फाईल्समध्ये आढळतो, हे अधिक गंभीर आहे. एपस्टीनशी मोदींची गाठ कोणी आणि का घातली? याचा शोध लागणे गरजेचे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण सांगितले.
ब्लॅकमेलिंग, इस्रायलसाठी गुप्तहेर असल्याचा संशय
जेफ्री एपस्टीन हा इस्रायलसाठी काम करणारा गुप्तहेर होता आणि जगभरातील प्रभावशाली लोकांना गुंतवून त्यांचे ब्लॅकमेलिंग करणे, हे त्याचे काम होते, असा गंभीर आरोपही चव्हाण यांनी केला. भारतीय नेत्यांवरही अशा प्रकारचे ब्लॅकमेलिंग झाले आहे का? याचा तपास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारचे मौन चिंताजनक
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर चर्चा आणि ट्रोलिंग होत असताना, भारत सरकारकडून एकही अधिकृत स्पष्टीकरण न येणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय भारतीय राजकारणावर मोठा परिणाम शक्य होऊ शकतो. या प्रकरणाचे परिणाम भारतीय राजकारणावर खोलवर होतील, आणि भविष्यात मोठे राजकीय बदल संभवतात, असे आपले विश्लेषण आजही कायम असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी ठामपणे सांगितले. मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल, हे आपले राजकीय विश्लेषण असल्याचेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.