
वाहतूक कोंडीवर नियंत्रण कधी येणार, चार फाटा आणि श्रीराम पुल हॉटस्पॉट
कर्जत: कर्जत या पर्यटन तालुका बनत असलेल्या ठिकाणी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यात सुट्ट्या सुरू झाल्याने कर्जत चार फाटा आणि श्रीराम पुल हे वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रेल्वेमार्गावर नवीन पुल आणि श्रीराम पुलाच्या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाची कामे जलदगतीने पूर्ण करावीत अशी मागणी पुढे आली आहे.
मध्य रेल्वे वरील कर्जत हे शहर आणि कर्जत तालुका आता पर्यटनात आघाडीवर आहे.या तालुक्यात पर्यटनासाठी वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी व्हायची आणि शनिवार रविवार या दोन दिवशी मुंबई पासून पुढे कर्जत कडे येणाऱ्या चौक रस्त्यावर वाहनांची गर्दी असायची.त्याचा परिणाम कर्जत चार फाटा आणि श्रीराम पुल येथे शनिवार रविवार वाहनाच्या रांगा लागलेल्या असायच्या.आता शाळा कॉलेज यांच्या परीक्षा संपल्याने सुट्टी लागली असून आता कर्जत तालुक्यातील रस्ते वाहतूक कोंडीच्या अग्रस्थानी आले आहेत.कर्जत तालुक्याच्या नेरळ भागात जाणारी वाहने ही चार फाटा येथून पुढे कल्याण रस्त्याने जात असतात.
त्यामुळे अशा वाहनाची गर्दी कर्जत चार फाटा येथे होऊन वाहतूक कोंडी होती.तर कर्जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि कर्जत शहरात जाणारी वाहने रेल्वे पुलावरून पुढे जातात.कर्जत तालुक्याच्या कडाव कशेले भागाकडे जाणारी वाहने ही श्रीराम पुलावर वाहतूक कोंडी करून असतात.त्यामुळे आता दररोज कर्जत शहरात येणारे रस्ते वाहतूक कोंडी मध्ये अडकून गेलेले पाहायला मिळत आहेत.त्यात सध्या सुरू असलेली लग्न सराई यामुळे त्या वाहनाची गर्दी देखील वाढली असून अनेकांना या वाहतूक कोंडी मुळे लग्न कार्याला उशिरा जावे लागत आहे.
गेली काही वर्षे सातत्याने कर्जत चार फाटा आणि श्रीराम येथे होणारी वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी प्रशासन कोणत्याही हालचाली करताना दिसत नाही. मध्य रेल्वेच्या मार्गावर नवीन पुल झाला असता तर कर्जत शहरातून येणारी वाहने यांची वाहतूक कोंडी रेल्वे पुलावर झाली नसती.तर कर्जत चार फाटा येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथे अतिक्रमणे तोडल्यानंतर रस्त्याची रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून करण्यात आलेली नाहीत.त्याचा परिणाम कर्जत चार फाटा वाहतूक कोंडीचा केंदेबिंदू बनला आहे.तर उल्हास नदीवरील श्रीराम पुल येथे होणारी वाहतूक कोंडी ही प्रशासनामुळे होणारी वाहतूक कोंडी आहे.त्या ठिकाणी सध्याच्या पुलाच्या बाजूला नवीन पुल बांधण्यात येत आहे.त्या पुलाचे काम 2023 पासून सुरू असून पुलाचे काम वेळेत पूर्ण झाले असते तर कदाचित कर्जत श्रीराम पुल परिसर वाहतूक कोंडी मुक्त झाला असता.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पुलाच्या कामाला गती देण्यात येत नसल्याने स्थानिक वाहन चालक नाराज आहेत.
कर्जत तालुका पर्यटनाच्या नकाशावर आघाडीवर दिसू लागला आहे.त्यामुळे शनिवार रविवार वगळता प्रत्येक दिवशी पर्यटक कर्जत तालुक्यात येत आहेत.त्यामुळे पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा वाढल्या असून प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी कर्जत चार फाटा भागात मोठा उड्डाण पूल उभारावा आणि कर्जत चार फाटा परिसराला वाहतूक कोंडी मधून मुक्तता करावी अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.