सौजन्य - नवराष्ट्र टीम
इचलकरंजी : राज्य सरकार एआय (कृत्रिम बुध्दीमता) तंत्रज्ञानावर भर देत उसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पवार काका-पुतण्याचा राज्यातील सर्व कारखानदारांना एकत्र करून पुढील हंगामापर्यंत हा प्रयोग संपुर्ण राज्यभर यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन वाढविल्यानंतर कारखानदार काटामारी व रिकव्हरी चोरून शेतकऱ्यांची सर्रास लूट करू लागले आहेत. याबाबत मात्र पवार काका-पुतणे मुग गिळून गप्प का आहेत ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथील साखर आयुक्त सिध्दराम सालिमट यांच्या बैठकीनंतर केला.
राज्य सरकारकडून एआय तंत्रज्ञानासाठी ५०० कोटी रूपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिले पाहिजे, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे, यामध्ये दुमत नाही. यासाठी राज्य सरकार जे प्रयत्न करत आहे, ते स्वागतार्ह आहेत. राज्यातील कारखानदारांनी गाळप क्षमता वाढविली, मात्र उसाचे क्षेत्र तेवढेच राहिल्याने कारखाना कार्यक्षेत्रात उस कमी पडू लागल्यामुळे यावर्षी सर्वच कारखान्यांनी गाळप क्षमतेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी उस गाळप केला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर परिणाम होऊन प्रक्रिया खर्चात वाढ होत आहे. राज्यातील कारखानदारांना माहित होते कि उसाचे क्षेत्र तेवढेच आहे. तरीही हव्यासापोटी संगनमताने गाळप क्षमता वाढविली आहे. याचाच परिणाम कारखान्यांच्या उत्पादन खर्चावर होऊन उत्पादन खर्चात वाढ होऊ लागली आहे.
सरकारकडून उपाययोजनेकडे दुर्लक्ष
राज्य सरकार व कारखानदारांचे शेतकऱ्यांच्या बद्दलचे बेगडी प्रेम असून खरच जर त्यांना शेतकरी हित जोपासायचे होते, तर उच्च न्यायालयाने एकरक्कमी एफआरपीचा निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आवश्यकता नव्हती. साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी राज्य सरकार व कारखानदार मिळून एआय तंत्रज्ञानावर भर देत आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्व कारखानदार सर्रास काटामारी व रिकव्हरी चोरी करू लागले आहेत. याबाबत गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही राज्य सरकारकडून कोणतीच उपाययोजना करण्यात आली नाही, अशी खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.
रिकव्हरी चोरीबाबत भाष्य करणार का?
ज्या तत्परतेने कारखाने एआय तंत्रज्ञानासाठी झटत आहेत. त्याच तत्परतेने काटामारी व रिकव्हरी चोरी थांबविल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. अन्यथा रात्र दिवस रक्ताच पाणी करून पिकवायच आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटायचे, हे आता चालणार नाही. साखर कारखान्यांच्या काटामारी व रिकव्हरी चोरीबाबत पवार काका-पुतण्यांनी कधी भाष्य केले नाही. जर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काटामारी व रिकव्हरी चोरीवर आळा घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर अजून वाढला असता, असेही शेट्टी म्हणाले.