दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. मे महिन्यात आलेल्या वादळात या शाळेच्या छताचे मोठे नुकसान झाले असून, १६ मेपासून वर्गखोल्या बिनछपराच्या अवस्थेत आहेत. सध्या पावसाळा सुरू असूनही विद्यार्थ्यांना उघड्या वर्गांमध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे “आमच्या लेकरांनी भर पावसात शिकायचं कुठं…?” असा आर्त सवाल आदिवासी पालक करत आहेत. या शाळेचे व्यवस्थापन मातृसत्ताक असून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शिक्षणाची सोय करून देणे ही संस्थेची नैतिक जबाबदारी आहे. मात्र शाळेच्या छताच्या दुरुस्तीबाबत संस्था आणि संचालक मंडळ कमालीचे उदासीन असल्याचे चित्र उघड झाले आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर इमारत यापूर्वीही पडकी होती, परंतु एका सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी तिची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात आली होती. मे महिन्यात आलेल्या वादळात या इमारतीचे छप्पर उडाले. गावात ८७ घरांचे आणि काही शासकीय मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले, त्याच वेळी ही दुर्घटना घडली. पण दीड महिना उलटूनही शाळेचे छत दुरुस्त करण्यात आलेले नाही. खोडाळा हायस्कूलमध्ये इयत्ता १०वी पर्यंतचे वर्ग आहेत व येथेच शालांत परीक्षा केंद्र सुद्धा आहे. गेल्या ५० वर्षांपासून ग्रामस्थांनी आपल्या पदरमोड करून शाळेचा विकास केला आहे. स्थानिक स्कूल कमिटीने वेळोवेळी प्रयत्न करून इमारतीत वाढ केली असून, खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून सुद्धा एक प्रशस्त हॉल उभारण्यात आला आहे.
तथापि, संस्थेचे कार्यकारी मंडळ या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप ग्रामस्थ व स्थानिक स्कूल कमिटीने केला आहे. या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयेच संस्थेच्या वतीने देऊ करण्यात येत आहेत, उर्वरित खर्च ग्रामस्थांनी करावा, अशी भूमिकाही संस्थेने घेतल्याचा आरोप स्कूल कमिटीचे चेअरमन प्रल्हाद कदम यांनी केला आहे.
आजही मुलं भर पावसात ओल्या भिंतीखाली अभ्यास करत आहेत. शासनाने आणि संस्थेने तत्काळ लक्ष देऊन या विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडणे अत्यावश्यक आहे.