दीपक गायकवाड, मोखाडा : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे मोखाडा महाविद्यालयातील शिक्षक रामचंद्र शंकर गवळी, रा. गडहिंग्लज (कोल्हापूर) याने त्याचे गैरहजर काळातील हजेरी पटावर सह्या करून नामांकित शिक्षण संस्थेची फसवणूक केल्याबद्दल जव्हार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती माया मथुरे यांनी आरोपीस नुकतीच ४ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अंतर्गत आरोपी रामचंद्र शंकर गवळी हा शिक्षक (निदेशक) पदावर कार्यरत होता. त्याची बदली दहिवडी (सातारा) महाविद्यालयातून संस्थेच्या मोखाडा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात झाली होती. बदली कार्यमुक्तीचा आदेश होऊनही तो मोखाडा महाविद्यालयात नियोजित दिवशी रुजू न होण्याचे कोणतेही कारण न देता सुमारे ३ महिन्यानंतर त्याठिकाणी रुजू झाला. असे असताना त्याने महाविद्यालय प्रशासनाचे परवानगीशिवाय त्यांचे अपरोक्ष मागील ५३ दिवसांच्या गैरहजर काळातील हजेरीपटावर अनाधिकाराने खोट्या नोंदी घेऊन व सह्या करून संस्थेची दिशाभूल व फसवणूक करून गैरहजेरीच्या काळातील पगार घेतला. आरोपीची ही बनावगिरी महाविद्यालय प्रशासनाचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन प्राचार्य श्री. भोर यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने प्राचार्य व विद्यार्थी यांच्याशी गैरवर्तन केले.
आरोपीच्या या अपराधाबाबत प्राचार्य यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. मात्र पोलीसांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवून न घेता विभागीय चौकशी करण्याची संस्थेस सूचना केली. म्हणून संस्थेने आरोपीविरूद्ध चौकशी समिती नेमली असता त्याच्यावरील आरोप खरे असल्याचे चौकशीअंती आढळून आले. त्यामुळे महाविद्यालयाने जव्हार न्यायालयात आरोपी रामचंद्र शंकर गवळी याचे विरुध्द भारतीय दंड संहिता कलम ४२० व ४६८ प्रमाणे खाजगी फौजदारी खटला दाखल केला होता. सदर खटल्याचे कामकाज सुमारे १३ वर्षे चालले.
या खटल्यात फिर्यादी पक्षाने पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये आरोपीचे विरुद्ध सबळ पुरावा पुढे आल्यामुळे त्याचेविरुध्द गुन्हा शाबीत करण्यास फिर्यादी पक्ष यशस्वी ठरले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीस फसवणूकीचे गुन्ह्यासाठी ४ वर्षे व बनावटीकरणाचे गुन्ह्यासाठी ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि या प्रत्येक गुन्ह्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. पी. मथुरे यांच्या न्यायालयाने गुरुवार, दि. १८ सप्टेंबर रोजी हा निकाल दिला. खाजगी फौजदारी खटला शाबीत होणे फारच दुर्मिळ असते. मात्र हा गुन्हा शाबीत होण्यासाठी फिर्यादीचे वकिलांनी खूप मेहनत घेतली व त्यांना याकामी संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयीन कर्मचारी यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे नामांकित वकील कल्याणी नि. मुकणे तर आरोपीतर्फे ज्येष्ठ वकील आर. एस. मेतकर यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या एका नामांकित शैक्षणिक संस्थेस फसविणाऱ्या व शिक्षकी पेशास कलंकीत करणाऱ्या अपराध्यास कठोर शासन झाल्याने परिसरांत समाधान व्यक्त करण्यात येत असून तालुक्यातील जनतेने व त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Web Title: Court fines teacher for forging signatures on attendance sheet to hide absence