'बोलणार नाही, हे चालणार नाही'; मराठी भाषेवरून अजित पवारांचं हिंदी भाषिकांसदर्भात मोठं विधान
Ajit Pawar News: राज्यातल्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या पर्यायामध्ये हिंदी सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाविरोधात एकत्र येत ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या मोर्च्याआधीच सरकारकडून या निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
अजित पवार म्हणाले, “मी माझं मत मांडलं आहे. आज कॅबिनेट बैठक आहे, तिथे या मुद्द्यावर चर्चा करू. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात असं वाटतं. मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही मराठी शिकवणं बंधनकारक केलं आहे. आता हिंदीबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी शिकवावं, आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी, असं माझं वैयक्तिक मत आहे. जो मुलगा मराठीत लिहू-वाचू शकतो, तो हिंदी देखील शिकू शकतो, कारण दोन्ही भाषांची लिपी सारखीच आहे. त्यामुळे हिंदी शिकायला वेळ दिला तरी चालेल.”
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चा जाहीर केल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, “कोणी कोणाला विरोध करतो, याच्याशी आमचा काही संबंध नाही. कोणी एकत्र यावं का नाही, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. लोकांनी यात नाक खुपसण्याचं कारण नाही. आम्ही त्यांना वेगळं व्हा असंही कधी सांगितलं नव्हतं. त्यांनी काय करावं, हे त्यांचं ठरवायचं आहे. प्रत्येक पक्षाचा स्वतःचा प्रमुख असतो, आणि संविधानानं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला आहे.मोर्चा काढण्याची वेळच येऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
दरम्यान, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)च्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
हे आधुनिक युद्धाचे उत्कृष्ट उदाहरण…; ‘ऑपरेशन सिंदूर’ची रॉयल एअर फोर्सने केली वाह वाह
या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सारथी संस्थेच्या कामाला सरकारकडून गती दिली जात असून, त्यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
ते पुढे म्हणाले की, ही संस्था अजून नवीन आहे आणि तिच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सारथीच्या युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आता सामाजिक जबाबदारी म्हणून पुढे येऊन नव्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.