वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप (संग्रहित फोटो)
यवतमाळ : फवारणी करताना विषबाधा होऊन एका शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना पांढरकवडा तालुक्यातील आकोली खुर्द येथे शनिवारी (दि. 28) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. 2017 मध्ये जिल्ह्यातील तब्बल 23 शेतकरी शेतमजुरांचा कीटकनाशक फवारणीदरम्यान मृत्यू झाला होता. त्याच घटनांची ही पुनरावृत्ती समजली जात होती. त्यावेळी या घटनांनी संपूर्ण राज्यच ढवळून निघाले होते.
देविदास पुंडलिक ढेकणे (वय 45, रा. शास्त्री वॉर्ड. पांढरकवडा) असे कीटकनाशक फवारणीदरम्यान विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतमजुराचे नाव आहे. शनिवारी दुपारी तो पांढरकवडा तालुक्यातील आकोली खु. येथील रमेश गोविंदराव काळे यांच्या शेतात नेहमीप्रमाणे मजुरीसाठी गेला होता. दुपारी 2 वाजताच्या सुमारास तो फवारणी करत असताना अचानक त्याला मळमळल्यासारखे झाले. एवढेच नव्हे तर ओकारी होऊन तो जमिनीवर कोसळला. ही बाब शेजारी शेतकरी आणि शेतमजुरांच्या लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उमरी रोड साजाचे ग्राम महसूल अधिकारी पी. व्ही. रुईकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तसेच वरिष्ठ स्तरावर संबंधिताचा मृत्यू हा कीटकनाशक फवारणी करताना विषबाधेने झाला असल्याचा अहवाल सादर केला.
शेकडो शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा
जिल्ह्यात 2017 मध्येही सर्वप्रथम शेकडो शेतकरी, शेतमजुरांना कीटनाशक फवारणी करताना विषबाधा झाली होती. त्यातील 23 जणांचा उपचारादरम्यान आणि उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ही बाब माध्यमांनी पुढे आणताच संपूर्ण राज्यात हा विषय गाजला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री, कृषिमंत्री, पालकमंत्री आदींनी अनेकांकडे भेटी देऊन चौकशी केली होती. शिवाय प्रशासनाला उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तीन वर्षाने म्हणजेच 2020 मध्ये 22 शेतकरी शेतमजुरांना विषबाधा झाली होती. मात्र, त्यांना तत्काळ उपचार मिळाल्याने सुदैवाने कुणाचीही जीवितहानी झाली नव्हती. त्या घटनेनंतर तब्बल पाच वर्षाने ही पहिली घटना उघडकीस आली.