भाजप-ठाकरे युती होणार का? चंद्रकांत पाटील अन् उद्धव ठाकरेंची भेट; नेमकं काय घडतंय?
मुंबई : राज्यात ठाकरे गट आणि भाजपची पुन्हा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि भाजपमधील जवळीक देखील वाढली आहे. हिवाळी अधिवेशानावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली होती. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानतर राज्यात लवकरच भाजप-ठाकरेंची युती होईल, अशा चर्चा सुरु आहेत.
अशातचं आता भाजपाचे नेते पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त उद्धव ठाकरे वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी पोहचले तेव्हा भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांची भेट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची आज एका लग्न सोहळ्यामध्ये भेट झाली आहे. भाजपाचे विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या लग्नसोहळ्यात भेट झाली आणि राजकारणावर चर्चा देखील झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच ठिकाणी भेटल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत.
भेटीवेळी यावेळी आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मग युती कधी? अशी गुगली टाकली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हजरजबाबीपणे मी या सुवर्णक्षणांची वाट पाहतोय, असं उत्तर देवून टाकलं. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर खासदार संजय राऊत यांना आजच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी युतीच्या घडामोडींना पुरक ठरतील, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गट यांच्या युतीच्या सुवर्णक्षणांची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
हे सुद्धा वाचा : जत पोलिसांची मोठी कारवाई; वयोवृद्ध महिलेला लुटणाऱ्याला ठोकल्या बेड्या
मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पराग अळवणी यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता. त्यानिमित्ताने शिवसेना नेते उद्धव ठाकरे वधू-वरांना शुभार्शीवाद देण्यासाठी पोहचले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत हे देखील होते. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट देखील चर्चेत आली होती. भाजपाचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. आता एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारु लागल्याने राजकारणात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाशी युती करतात की काय ? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.