सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : अतिवृष्टीमुळे विदर्भ व मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे, कधीही नव्हते असे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे, या नुकसानीबाबत सरकार काय धोरण जाहीर करते, हे पाहणे महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत आणि विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, नुकसानीमुळे शेतकरी संकटात आहे, राज्य सरकारच्या वतीने याबाबत नेमके काय धोरण जाहीर केले जाते, हे पाहावे लागेल. असे संकट या पूर्वी आलेले नव्हते, त्यामुळे सरकार यात नेमकी काय मदत करणार, काय नुकसान भरपाई देणार हे महत्वाच असेल. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात पिके वाहून गेली असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आर्थिक व इतर बाबतीतही दिलासा देणे गरजेचे आहे.
मराठवाडा दुष्काळात असतो, यंदा अतिवृष्टीच संकट आहे. सोलापूर व सातारा भागातही काही ठिकाणी नुकसान झालेले आहे. शेतकरी पुन्हा मोठ्या अडचणीत सापडला आहे. राज्यातील एकूण कृषी क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र पूर व पावसाने संपले आहे, राज्य सरकारकडे अद्यापही नुकसानीची नेमकी आकडेवारी नाही मात्र उपलब्ध माहितीनुसार जवळपास ७० लाख हेक्टरवरील पिक यात नष्ट झाले आहे. हे मोठे संकट आहे, यात शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यावश्यक असून, तो तातडीने देणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा : चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…