जालना : शहरात दारूबंदी असली तरी ठिकठिकाणी दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरूण पिढी वाया जात सल्याचे चित्र आहे. अशातच विरुळ येथे मद्यधुंद युवकाने दारू ढोसून मोबाईल टॉवरवर (Youth on Mobile Tower) चढून धिंगाणा घातला. एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने टॉवरवर उंचावर कवायती सुरू केल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका तरूणाने दारू ढोसून दुपारच्या सुमारास मोबाईल टॉवरच्या टोकावर चढला. तेथे चढून कवायती करत धिंगाणा घातला. वर चढून जोरजोराने ओरडून हात सोडून कवायती केल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील मोबाईल टावरच्या कर्मचाऱ्यांनी गावातील पोलिस पाटील यांना घटनेची सूचना दिली.
युवकाला खाली उतरण्याची विनवणी केली. मात्र, खाली उतरण्याचे युवक नाव घेत नव्हता. शेवटी नागरिकांनी 112 वर घटनेची सूचना दिली. पोलिस येणार या भीतीने तरूणाने पोलिस येण्यापूर्वीच त्याने टॉवरवरून खाली उतरला. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. युवकाला समज देऊन घरी पाठवण्यात आले.