भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिका(फोटो-सोशल मीडिया)
India vs New Zealand, first T20 match ticket sales : विदर्भ क्रिकेट असोसिएशन २१ जानेवारी रोजी आयडीएफसी फर्स्ट बँक टी-२० ट्रॉफीचा भाग म्हणून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना जामठा येथील त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. जामठा स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा पहिला द्विपक्षीय टी-२० सामना असणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री १७ जानेवारीपासून होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा टी-२० सामना २०१६ मध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकादरम्यान येथे खेळवण्यात आला होता. व्हीसीएकडून माहिती देण्यात आली आहे की, व्हीसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम सामना आयोजित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून प्रेक्षकांसाठी मोफत आणि भरपूर पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, तसेच मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली गेली आहे. न्यूझीलंड संघ १९ जानेवारी रोजी इंदूरहून चार्टर्ड विमानाने नागपुरात दाखल होणार आहे, तर निवडक भारतीय टी-२० खेळाडू देखील १९ जानेवारीपर्यंत नागपुरात पोहचणार आहे.
हेही वाचा : GT vs UP, WPL 2026 : आज यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स आमनेसामने! पहिल्या विजयासाठी करणार प्रयत्न
सर्वसामान्यांसाठी तिकीट विक्री १७ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता “डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो” मोबाइल अॅप आणि “डिस्ट्रिक्ट.इन” वेबसाइटद्वारे ऑनलाइन सुरू होणार आहे. एका मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच्या आधारे प्रति व्यक्ती जास्तीत जास्त दोन तिकिटे बुक करू शकतो.
ऑनलाइन बुक करण्यात आलेले तिकिटे १८ ते २० जानेवारी दरम्यान सकाळी ९:३० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत सिव्हिल लाईन्समधील बिलिमोरिया हॉल येथे घेता येणार आहेत. जामथा स्टेडियममध्ये कोणतेही रिडेम्पशन काउंटर असणार नाही.






