
आई तुळजाभवानीतील जगदंबा भूमिका साकारणारी अभिनेत्री विजयालक्ष्मीचा खास इंटरव्ह्यू
‘आई तुळजाभवानी’ मालिका लवकरच ४०० भाग पूर्ण करणार आहे. सध्या या मालिकेत जगदंबा आणि शिवा यांच्या अलौकिक क्षणांचा अनुभव प्रेक्षक घेत आहेत. सध्या जगदंबेला तिच्या शक्तीची जाणीव नव्हती आणि आता हीच जाणीव होणार आहे आणि ३० नोव्हेंबर रोजी हा भाग प्रसारित होईल. महिपती यामध्ये कसा खोडा घालतोय आणि कसा त्रास देतोय हेदेखील सध्या प्रेक्षक अनुभवत आहेत.
महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला, जगदंबा कशी सामोरी जाणार? जगदंबा, शिवा आणि नंदी यांचा मार्ग कसा मोकळा होणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. याच निमित्ताने जगदंबा भूमिका साकारत असणारी अभिनेत्री विजयालक्ष्मी कुंभारने ‘नवराष्ट्र’सह खास बातचीत केली आहे.
जगदंबाची भूमिका कशी मिळाली?
विजयालक्ष्मीने अगदी सहजपणाने सांगितले की, ‘याआधी नाटकांमध्ये काम करण्याचा अनुभव होता पण मालिकेतील हे पहिलंच काम आहे. रितसर ऑडिशन देऊन आणि लुक टेस्ट देऊनच जगदंबाची भूमिका मिळाली आहे. अगदी साधी सरळ आणि सालस असणारी जगदंबा साकारताना मजा येत आहे’
मुख्य भूमिका पहिल्यांदाच करण्याची संधी, कमालीचा अनुभव – सृजन देशपांडे
नाटक आणि मालिकेत काम करताना काय फरक जाणवतोय?
‘आतापर्यंत नाटकांमध्ये काम करत होते. मालिकेत काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. स्टेजवर काम करताना २ तास सलग काम करावं लागतं आणि काही चुकलं की मग सुधारता येत नाही. पण मालिकेत तसं नाही, मालिकेतील संवाद पाठ असतातच, पण कधी चुकलं तर रिटेक घेता येतो. नाटकात काम करत असल्याने पाठांतर चांगलं आहे, त्यामुळे इथे कधी त्रास होत नाही’ असं विजयालक्ष्मी म्हणाली. पुढे तिने सांगितले की, ‘नाटकात काम करताना अगदी आवाजही असा असतो की तो शेवटपर्यंत प्रेक्षकांना ऐकायला गेला पाहिजे आणि मालिकेत काम करताना तितकेच सौम्य आवाजात काम करावे लागते. मालिकांमध्ये दिवसाला वेगवेगळे लुक आणि शॉट्स द्यावे लागतात, पण नाटकात संहिता असते आणि तिथे चुकीला वाव नसतो. ही माझी पहिलीच मालिका आहे आणि त्यातही पौराणिक धाटणीची असल्याने एक वेगळाच अनुभव मला मिळतोय.’
या भूमिकेसाठी काही वेगळा अभ्यास वा तयारी केलीस का?
यावर विजयालक्ष्मी अगदी सहजपणाने म्हणाली की, ‘खरं सांगायचं तर मला जास्त काही वेगळी तयारी करावीच लागली नाही. कारण जगदंबा या भूमिकेसाठी लागणार जो स्वभाव आहे तशीच मी खऱ्या आयुष्यात आहे. त्यामुळे अगदी दिग्दर्शकांनीही सांगितले होते की, जशी आहेस तशीच रहा, वेगळा असा काही अभिनय करू नकोस आणि मी तेच फॉलो केलं. जगदंबा दाखविण्यासाठी वेगळं असं करावं लागलं नाही’
महिपतीने रचलेल्या चक्रव्यूहाला जगदंबा कशी जाणार सामोरी? ‘आई तुळजाभवानी’चा पहा महा एपिसोड
जगदंबेची भूमिका करताना मेकअपसाठी खूप वेळ लागतो का?
‘जगदंबा ही गावातली साधी मुलगी दाखवली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. फक्त तुळजाभवानीचा अवतार करताना मेकअपसाठी वेळ लागतो. माझा भूमिकेसाठी लागणारा मेकअप हा अत्यंत Minimal आहे. त्यामुळे मी पटकन तयार होते’ असं विजयालक्ष्मीने आवर्जून सांगितले.
स्किन केअर कसे सांभाळतेस?
कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्किन केअर महत्त्वाचे असते आणि त्यासाठी विजयालक्ष्मी म्हणाली की, ‘मी जास्तीत जास्त हायड्रेट कसे राहता येईल याकडे लक्ष देते. फळं खाणं, हेल्दी जेवण जेवणे फॉलो करते. तसंच तेलकट खाणे टाळते आणि स्किन केअर रूटीन सांगायचे तर सध्या मी बाहेर कोल्हापुरात शूट करत आहे. पण कायमस्वरूपी सनस्क्रिन वापरणं हेच माझ्या स्किनचं रहस्य आहे. याशिवाय त्वचा मॉईस्चर करणंदेखील मी फॉलो करते.’
आई तुळजाभवानीतील जगदंबा ही भूमिका सध्या वाखाणली जात असून ती साकारणारी अभिनेत्री विजयालक्ष्मीही तितकीच शांत आणि सटल आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी तिने मनमोकळेपणाने सर्व उत्तर देत जाताना सर्वांना आपले काम पाहण्याची विनंती आवर्जून केली.