सौजन्य - कुशल बद्रिके इन्स्टाग्राम स्टोरी
‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कुशल आपल्या कामाव्यतिरिक्त अनेक मजेशीर पोस्ट शेअर करत असतो. कधी ती पोस्ट बायको संदर्भात तर कधी मित्रांसंदर्भात पोस्ट लिहित असतो. काही तासांपूर्वीच कुशलने इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या दिवसांवर भाष्य केलं आहे.
प्रत्येकाच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुंबई लोकलचा एक मोलाचा वाटा आहे. मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे प्रवासासाठी उत्तम आणि सुखकर पर्याय ठरला आहे. अभिनेत्याने याच लोकलचं उत्तम उदाहरण देत आयुष्याबद्दल काही भाष्य केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये कुशल म्हणतो, “सुरवातीच्या काळात मी ट्रेनने भरपूर प्रवास केला. तिथले पाळायचे नियम आणि टाळायचे नियम मला ट्रेन्सच्या टाईमटेबल सारखेच पाठ होते. ट्रेनमध्ये भजनात रमणारे दर्दी पाहिले. तशीच डब्यातली गुंडा-गर्दी पाहिली.”
” काळ्या कोटाची भीती त्या प्रवासात जी मनात भरली ती पुढे आयुष्याच्या प्रवासात कायम राहिली. “बकासुरा सारखी माणसांचे लोंढे गिळणारी ही ट्रेन. कुठेतरी जाऊन पुन्हा माणसं ओकते.” असले भयंकर विचार तेव्हा मनात यायचे. आपली ट्रेन सुटू नये म्हणून रोज धावपळ करणाऱ्या मला ही ट्रेन एकदाची कायमची सुटावी असं वाटत राहायचं. आता ट्रेन कायमची सुटली… पण आयुष्य त्या ट्रेनच्या डब्ब्या सारखं झालंय, ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर उतरून निघून जातात. सहप्रवासी बदलत राहतात. प्रवास मात्र कायम असतो!! – सुकून.”
इन्स्टा स्टोरी शेअर करताना अभिनेत्याने त्याचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केलेला आहे. दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’नंतर कुशल बद्रिके ‘सोनी टीव्ही’वरील ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात पाहायला मिळाला. या कार्यक्रमातील कुशल, हेमांगी आणि गौरवच्या स्किटचे व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असायचे.






