महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ (Photo Credit -X)
मुंबई: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतः ला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासन ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रम राबवित आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी सुखराज नाहर यांनी व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (व्हिएसटीएफ) ला एक कोटींचे अनुदान दिले.
🤝CM Devendra Fadnavis presided over the MoU signing and exchange between School Education & Sports Department of Maharashtra, the Maharashtra Institution for Transformation (MITRA) and actor Tiger Shroff to give a boost to Maharashtra’s ‘Maha-Deva’ Football initiative.… pic.twitter.com/7jMqLr10he — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 17, 2025
यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, अभिनेता टायगर श्रॉफ, नाहर ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष सुखराज नाहर आदी उपस्थित होते.
महत्त्वाकांक्षी ‘महा-देवा’ फुटबॉल प्रतिभा विकास उपक्रमाला मोठी चालना मिळाली असून बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ यांनी या प्रकल्पासाठी पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करण्यास सहमती दर्शविली आहे. ‘महा-देवा’ हा राज्यातील मुला-मुलींमधील फुटबॉल प्रतिभा ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा उपक्रम आहे. डब्लूआयएफएच्या स्काऊटिंग नेटवर्कद्वारे राज्यातील 30 मुले आणि 30 मुलींची निवड करून त्यांना तांत्रिक प्रशिक्षण, शैक्षणिक मदत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
‘मित्रा’ या उपक्रमात जागतिक फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेस्सी यांनाही जोडण्याचे काम करणार आहे. त्यामुळे महा-देवा उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठा दर्जा मिळणार आहे.
कार्यक्रमासंदर्भात जनजागृती, प्रचार साहित्य, सार्वजनिक कार्यक्रम, डिजिटल मोहिमा यामध्ये टायगर श्रॉफ यांचा सहभाग असेल. सर्व प्रचारात्मक साहित्य त्यांच्या पूर्व-मंजुरीनंतरच प्रसारित केले जाणार आहे.
राज्यातील फुटबॉल संस्कृतीला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने शासन, मित्रा आणि अभिनेता टायगर श्रॉफ एकत्र येत असल्याने महाराष्ट्रातील तरुण फुटबॉलपटूंना नवी संधी, मदत आणि प्रेरणा मिळणार आहे.






