"चार लोक मेले की बघू.."; शशांक केतकर इतकं कोणावर संतापला ? Video Viral
‘होणार सुन मी ह्या घरची’ मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेला शशांक केतकर सध्या चर्चेत आला आहे. सभोवताली घडत असलेल्या सामाजिक प्रश्नांवर अभिनेता कायमच सोशल मीडियावर दिलखुलास भाष्य करत असतो. सध्या शशांकला त्याच्या सोसायटीच्या बाहेरच्या ‘डबल पार्किंग’च्या समस्येमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अभिनेत्याने त्याचा हा संताप इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. अभिनेत्याने आपली नाराजी तीव्र शब्दांत बोलून दाखवली आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे आणि चाहतेही त्याच्या म्हणण्याला जोरदार समर्थन देत आहेत.
‘वामा- लढाई सन्मानाची’ चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाणे प्रदर्शित
शशांक नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. अशातच सध्या अभिनेत्याने त्याच्या परिसरातील एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शशांकने आपल्या सोसायटीबाहेरच्या रस्त्यावरचं चित्र दाखवतो. अभिनेता ठाण्यामध्ये राहत असलेल्या सोसायटीच्यासमोर एका माणसाने चुकीच्या पद्धतीने गाडी पार्किंग केल्याबद्दल त्याने व्हिडिओच्या माध्यमातून संताप व्यक्त केलेला आहे. व्हिडीओमध्ये शशांक म्हणतो, “भारतामध्ये माणसाचं आयुष्य आणि जगणं हे अत्यंत स्वस्त आहे आणि त्याची किंमत शून्य आहे. याची दुर्दैवाने पुन्हापुन्हा प्रचिती येते. ठाण्यातील माझ्याच सोसायटीच्या समोर एका माणसाने कमालीचं पार्किंग केलं आहे. रिकाम्या जागेत एक वेगळी गाडी उभी होती, त्यांना ती काढायची होती; म्हणून चार माणसांनी डबल पार्किंग केलेली गाडी आणखी बाहेर आणून ठेवली. आता ती पूर्ण रस्त्यावर आलेली आहे.”
यापुढे शशांकने म्हटलं, “या गाडीने रस्त्यावरची इतर जागा इतकी व्यापली आहे की, ज्यामुळे रस्त्यावर ये- जा करणाऱ्या लोकांना समस्या येतेय. तुम्हीच पाहा या एका गाडीने एका साईडची बाजू कशा पद्धतीने व्यापलेली आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम हाच आहे, या गाडीला आपटून चार माणसं मेली तरी काय फरक पडत नाही. आमच्या वसंत विहारमध्ये डबल पार्किंग करतात हा विषय तर मोठा आहेच. पण डबल पार्किंग केल्यानंतर त्याच्या मागची पार्किंग केलेली गाडी ज्यांना काढायची होती; त्यांनी दुसरी गाडी अशी बाहेर आणून ठेवली ज्याचा लोकांना किती त्रास होणार आहे हे तुम्हीच बघा. आहे की नाही गंमत.”
‘आता महानायक झोपेतून उठले…’, विमान अपघाताच्या २४ तासांनंतर बिग बींची पोस्ट चर्चेत; नेटकरी संतापले
यापुढे त्याने “खरंच आपल्याकडे जीव स्वस्त झाला आहे. मला माहित नाही ठाणे महानगरपालिकेची ही थेट जबाबदारी असते की नसते. पण त्यांना असं सांगणं आहे की, ही गाडी फक्त उचलू नका; तर स्क्रॅप करा” असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना शशांकने कॅप्शन दिलंय की, “ठिकाण- वसंत विहार ठाणे. समस्या- डबल पार्किंग. त्रास – घंटा काहीही नाही. उपाय- ४ लोक मेले की बघू” दरम्यान, शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शशांकच्या या स्पष्ट भूमिकेला त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक नेटिझन्सनी भरभरून समर्थन दिलं आहे. रस्त्यावरच्या अशा बेजबाबदारपणामुळे होणाऱ्या त्रासावर त्याने आवाज उठवल्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे.