मनोरंजन सृष्टीला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या (Tunisha Sharma Suicide) केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मालिकेचे शुटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने आपलं जीवन संपवलं आहे. नायगावमधील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
टुनिशा सध्या सब टीव्हीच्या (SAB TV) ‘दास्तान-ए-काबुल’ (Daastan- E- kabul) या शोमध्ये मुख्य भूमिका साकारत होती. याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. घटनेनंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टुनिशाने इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
टुनिशा शर्मा टीव्ही मालिका ‘इश्क सुभान अल्लाह’ मध्ये झारा/बबली आणि ‘इंटरनेट वाला लव’ मध्ये आध्या वर्माच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. टुनिषा शर्माचा जन्म 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या 14 व्या वर्षी तिची ‘भारत का वीर पुत्र – महाराणा प्रताप’ या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका साकारली होती. तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेतही काम केले आहे. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.
पुढे 27 ऑगस्ट 2018 ते 29 मार्च 2019 पर्यंत तिने कलर्स टीव्ही शो ‘इंटरनेट वाला लव्ह’मध्ये अध्या वर्माची भूमिका साकारली होती. टेलिव्हिजनशिवाय टुनिशा चित्रपटांमध्येही सक्रिय होती. तिने ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’ आणि ‘दबंग 3’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.