फोटो सौजन्य - Social Media
यंदाची स्टार प्रवाहची ढिंचॅक दिवाळी नवं रंग घेऊन येणार आहे. या दिवाळीत मनोरंजनाचा तडका आणि हास्याची आतषबाजी प्रेक्षकांसाठी सज्ज आहे. सणाची मजा दुपटीने वाढवण्यासाठी स्टार प्रवाह परिवाराने पुन्हा एकदा ढिंचॅक दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे. यंदा हा कार्यक्रम आणखी खास करणारी जोडी म्हणजे महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर डॉ. निलेश साबळे आणि भाऊ कदम.
गणेशोत्सवाच्या जल्लोषानंतर आता दिवाळीचा आनंद स्टार प्रवाह परिवारासोबत घेता येणार आहे. फराळाच्या तडक्यासोबतच या दिवाळी कार्यक्रमात कॉमेडीचा खमंग तडका आणि कलाकारांचे लखलखते परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या मनात छाप सोडणार आहेत. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची जोडी प्रेक्षकांसाठी कायमच उत्सुकतेची ठरते. गेल्या १५ वर्षांपासून एकत्र काम करत असलेली ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.
या कार्यक्रमासाठी निलेश साबळे म्हणाले, ‘खूप दिवसांपासून प्रेक्षक वाट पहात होते. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मी आणि भाऊ कदम स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमात काहीतरी भन्नाट घेऊन येतोय. भाऊसोबत काम करताना नेहमीच मजा येते. भाऊला मी कळलोय आणि मला भाऊ कळलाय असं म्हण्टलं तरी चालेल. गेली १५ वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. भूमिकेचं सोनं करणारा नट लेखकाला हवा असतो. भाऊ कदमचं पण काहीसं असंच आहे. प्रत्येक भूमिकेचं तो सोनं करतो. या कार्यक्रमातही प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजन असेल अशी भावना निलेश साबळे यांनी व्यक्त केली.’
भाऊ कदम म्हणाले, ‘यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने ढिंचॅक असणार आहे. स्टार प्रवाहसोबत पहिल्यांदा काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. निलेश साबळेसोबत इतक्या वर्षांची मैत्री आहे. हीच मैत्री निराळ्या ढंगात प्रेक्षकांसमोर येईल. दिवाळीला हास्याचा फराळ प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत तेव्हा पाहायला विसरु नका ढिंचॅक दिवाळी रविवार १२ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’
या दिवाळी कार्यक्रमात प्रेक्षकांना हसत-खेळत, आनंदी वेळ घालवता येईल आणि निलेश साबळे व भाऊ कदम यांच्या अफलातून जुगलबंदीचा अनुभव घेता येईल.