(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या निवडींमुळे ठसा उमटवणारी तापसी पन्नूही अभिनेत्री आज केवळ पडद्यावरच नाही, तर पडद्यामागेही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. महिला केंद्रित आणि आशयघन चित्रपटांची निवड करत त्यांनी सुरुवातीपासूनच मुख्य प्रवाहातील चौकटींना छेद दिला. त्यांच्या भूमिकांमध्ये केवळ मनोरंजन नसून एक ठाम संदेश आणि वास्तवाशी जोडलेली संवेदनशीलता दिसून येते.
महिला केंद्रित चित्रपटांची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होण्याच्या आधीपासूनच तापसी पन्नूने अशा कथांना प्राधान्य दिले, ज्यात स्त्री ही केवळ पूरक पात्र नसून कथानकाची मध्यवर्ती शक्ती असते. तिच्या या सातत्यपूर्ण निवडींमुळे त्यांनी एक सक्षम, विचारप्रधान अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. अभिनय आणि आशय यांचा समतोल साधत अभिनेत्रीने प्रेक्षकांपर्यंत प्रभावी कथा पोहोचवल्या आहेत.
२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘Blur’ या चित्रपटातून अभिनेत्रीने निर्माती म्हणून नवा प्रवास सुरू केला. या अनुभवाने तिला केवळ सर्जनशील समाधान दिले नाही, तर कथाकथनाच्या प्रक्रियेत अधिक खोलवर सहभागी होण्याची संधीही दिली. या भूमिकेत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल स्पष्टपणे सांगतात तापसी म्हणाली की, निर्मिती हा प्रवास जितका उत्साहवर्धक आहे, तितकाच तो आव्हानात्मकही आहे.
तापसीच्या मते, निर्माती म्हणून सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपल्या विचारांशी जुळणारे विषय आणि दिग्दर्शक शोधणे. त्या सांगतात, “मी वेगवेगळ्या विषयांवर आणि दिग्दर्शकांसोबत चर्चा करत आहे, पण मला ज्या कथांवर पूर्ण विश्वास आहे, त्यांनाच मी पुढे नेऊ इच्छिते.” अभिनेत्रीच्या या दृष्टिकोनातून स्पष्ट होते की, केवळ व्यावसायिक यश नव्हे तर आशयाला प्राधान्य देणे हा तिचा मुख्य उद्देश आहे.
चित्रपट निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, ‘ही जबाबदारी पूर्णपणे वेगळी असते. “निर्माती म्हणून सगळं एकत्र आणण्याची जबाबदारी तुमच्यावर असते योग्य टीम तयार करणे, योग्य लोकांची निवड करणे आणि सगळ्यांना एका दिशेने नेणे. अभिनेता म्हणून तुम्ही फक्त तुमच्या भूमिकेसाठी जबाबदार असता, पण निर्माती म्हणून संपूर्ण प्रकल्प तुमच्यावर अवलंबून असतो,” असे ती म्हणाली आहे. या प्रक्रियेत मिळणारे स्वातंत्र्य जितके मोठे आहे, तितकीच जबाबदारीही मोठी असल्याचे त्या मान्य करतात.
दरम्यान, तापसी पन्नू लवकरच ‘गांधारी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात त्या एका सशक्त आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. पालक आणि मुलाच्या नात्याच्या भावनिक, तीव्र आणि गुंतागुंतीच्या पैलूंवर आधारित ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी ठरणार आहे. एकंदरीत, तापसी पन्नू यांचा हा प्रवास केवळ अभिनेत्रीपासून निर्मातीपर्यंतचा नसून, अर्थपूर्ण आणि प्रभावी सिनेमाकडे वाटचाल करणारा आहे. तिच्या या नव्या भूमिकेमुळे भविष्यात प्रेक्षकांना आणखी वेगळ्या आणि आशयपूर्ण कथा पाहायला मिळतील, यात शंका नाही.






