मुंबई येथे सुरु असलेल्या मिफ्फ 2022 (MIFF 2022) अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी चर्चा आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात (MIFF Dialogues) आले होते. यावेळी ‘द गालोस’ या इंग्रजी चित्रपटामध्ये अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) गालोस नामक जमातीच्या परंपरा, संस्कृती तसेच प्राचीन औषध उपचार पद्धती, वस्त्रप्रावरणे तसेच त्यांची खाद्य परंपरा यांच्याबद्दलचे चित्रण करण्यात आले आहे. माझा चित्रपट गालो जमातीच्या राहणीमानाबद्दल माहिती देणारा चित्रपट आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक आपक गदी यांनी उपस्थितांना सांगितले.
या जमातीमध्ये चालत आलेल्या काही निषिद्ध गोष्टी तसेच रूढीपरंपरांचे देखील चित्रण केल्याचे त्यांनी सांगितले. या जमातीमधील नवी पिढी अधिकाधिक प्रमाणात पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली वावरताना दिसते आहे. अशा परिस्थितीत या जमातीच्या सदस्यांनी आणि सरकारने या समुदायामध्ये परंपरागत चालत आलेल्या उत्तम पद्धतींचे जतन करण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा आपक गदी यांनी यावेळी व्यक्त केली.
[read_also content=”मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला ‘मासा’ लघुपट, फुलवा खामकर यांचं दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल https://www.navarashtra.com/movies/masa-shortfilm-directed-by-phulawa-khamkar-is-selected-for-international-competition-group-of-miff-nrsr-287119.html”]
एखाद्या जमातीमध्ये पूर्वापार काळापासून चालत आलेल्या परंपरांचे पालन करत असताना जर त्या समाजातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीला देखील त्यांचा अर्थ माहित नसेल तर काय घडते हे ‘द साँग वुई सिंग, द ड्रम्स वुई बीट’ या चित्रपटात बघायला मिळते. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोम्बाँग दारंग म्हणाले की, हा चित्रपट अरुणाचल प्रदेशातील नॉक्टे या आणखी एका जमातीबद्दल माहिती सांगतो. या जमातीमध्ये देखील भाषेवर आधारित तीन उप-जमाती बघायला मिळतात. यापैकी काही जमातींच्या भाषा बोलणाऱ्या अत्यंत कमी व्यक्ती आता हयात आहेत असे ते म्हणाले. या नॉक्टे जमातीमध्ये लॉकड्रम नावाची एक वाद्य परंपरा आहे. अपघात अथवा युद्धासारख्या प्रसंगी इतरांना त्याची माहिती कळविण्यासाठी या ड्रमच्या वादनाच्या वेगवेगळ्या पद्धती या जमातीत वापरल्या जातात. या लॉकड्रम पद्धतीची माहिती या चित्रपटात दाखविण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
इंद्रजीत नाटोजी यांच्या दोन चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. ‘नादम’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक आवाजाला एक नाद असतो. रात्रीच्या भीतीदायक आवाजांना घाबरून जाग्या होणाऱ्या मुलीला शांत करण्यासाठी तिच्या आईने केलेला प्रयत्न यामध्ये दाखविण्यात आला आहे. या माध्यमातून ती आई आपल्या मुलीला ॲनिमेशन पद्धतीने भारतीय संगीताच्या सर्व पैलूंचे दर्शन घडवते.
ॲनिमेशन माध्यमाबद्दल बोलताना ते म्हणाले की, या माध्यमामुळे मला माझ्या कल्पना आणि संगीत यांना अत्यंत सुलभ पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. ‘कलर्स ऑफ लव्ह अथवा रंगसारी’ हा दुसरा चित्रपट अत्यंत स्वप्रेरणादायी आहे. सुप्रसिद्ध सुफी गायिका कविता सेठ यांच्या मुलाने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संगीताच्या प्रकारांचा अविष्कार घडविला आहे. रंग आणि संगीत यांच्या मिलाफातून, कृष्ण लीलांमुळे प्रभावित झालेल्या एका लहान मुलीचा स्त्री होण्यापर्यंतचा प्रवास आणि त्यात तिच्या आजूबाजूच्या गोष्टींनी घातलेली भर याचे चित्रण हा चित्रपट करतो अशी माहिती नाटोजी यांनी यावेळी दिली.