गायक केके (Singer KK) अर्थात कृष्णकुमार कुन्नथ यांच्या गाण्यांची जादू काय असते, हे आजच्या पिढीला माहीत आहे. त्यांच्या निधनानंतर अवघ्या देशभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता. मात्र, केके यांनी देशातील इतर अनेक भाषांसोबतत मराठी भाषेतही गाणं गायलं होतं, ही बाब फार थोड्या लोकांना माहिती असावी. मराठी सिनेरसिकांसाठी केकेच्या गाण्याचं सरप्राईज घेऊन येत्या 9 जून रोजी भेटीला येतोय आजच्या पिढीचा ‘अंब्रेला’ (Umbrella) चित्रपट. केके यांनी गायलेलं शेवटचं गाणं (KK Last Song) ‘एकांत हवा’ नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. (Singer KK Death Anniversary)
देशातल्या जवळपास 9 भाषांमध्ये केके यांनी गायन केलं. त्यात हिंदी तर अर्थात आहेच. पण त्यासोबतच, तमिळ, तेलुगु, मल्याळम, आसामी, ओरिया अशा भाषांचा समावेश आहे. आता मराठी भाषेचाही या यादीत समावेश झाला आहे. मराठीत केके यांनी अवघी दोन गाणी गायली आहेत. त्यातं पहिलं 8 वर्षांपूर्वी 2014मध्ये आलं होतं. तर दुसरं गाणं थेट आत्ता ‘अंब्रेला’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आज 31 मे रोजी केके यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने ‘अंब्रेला’च्या टीमकडून लाडक्या केकेंना ही एक श्रद्धांजलीच ठरावी!
‘माचिस’मधल्या छोड आए हम किंवा ‘हम दिल दे चुके सनम’मधल्या तडप तडप के या गाण्यांमधून आपल्याला भेटलेल्या केकेंहून ‘अंब्रेला’मधून आपल्याला भेटणारे केके फार वेगळे आहेत. त्यांच्या आवाजातल्या ‘एकांत हवा’ गण्यातून तरुणाईच्या मनातला उद्वेग अगदी थेट काळजापर्यंत जाऊन भिडतो. चित्रपटाच्या कथानकाला केके यांच्या आवाजातल्या गाण्यामुळे वेगळीच ताकद मिळाली आहे. मराठी भाषेतलं केके यांनी गायलेलं हे गाणं प्रत्यक्ष चित्रपटाचा भाग म्हणून प्रदर्शित होणारं पहिलं गाणं ठरलं आहे. त्यामुळेच ते एकमेवाद्वितीय ठरलं आहे!
अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्यातल्या प्रेमाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहेच. पण अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते यांच्या कसदार अभिनयाची मेजवानीही प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद देणारी ठरेल. चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन मनोज विशेंनी केलं आहे. स्वरनादची प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत.






