Chandrapur News: सिंदेवाहीत वाघाची दहशत! आठवडाभरात तिघांचा बळी, तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
विशेष म्हणजे सिंदेवाही तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला. आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात एकापाठोपाठ एक अशा तिघांचा मृत्यू झाला. यापूर्वी पहिली घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. ज्यामध्ये पळसगाव (जाट) येथील नानाजी नारायण कामडी (५५) हे शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर भीषण हल्ला करून त्यांना ठार केले होते. या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच २५ ऑक्टोबर रोजी दुपारी भेंडाळा शेतशिवारात तीळ कापत असलेल्या अंगणवाडी सेविका प्रेमीला पुंडलिक महाडोरे (५६, रा. भेंडाळा) यांच्यावर वाघाने झडप घालून त्यांना जागीच ठार केले होते. (फोटो सौजन्य: Pinterest)
तिसऱ्या घटनेत सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील धुमनखेडा येथे शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात रामाजी मेश्राम (७५, रा. धुमणखेडा) याचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या आठवड्याभरात दोन पुरुष आणि एका महिलेसह तिघांना वाघाने आपले भक्ष्य बनवल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
शेतात धानकापणी आणि इतर मशागतीची कामे सुरू असताना सातत्याने होणाऱ्या या जीवघेण्या हल्ल्यांमुळे शेतात जाणेही धोक्याचे बनले आहे. या नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा आणि पीडित कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता संतप्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सध्या शेतातील विविध कामांचा हंगाम सुरू असून, शेतक-यांना दररोज शेतात जावे लागते. मात्र, परिसरात वाधाचा वावर वाढल्याने शेतात जाणेही धोकादायक बनले, वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नवरगाव परिसरातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, त्यासाठी पिंजरे लावणे, नियमित गस्त वाढविणे, आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावणे तसेच वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी तातडीने विशेष पथक तैनात करावे. ४८ तासांच्या आत वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी. अन्यथा, नागरिकांना सोबत घेऊन वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येईल.- राहुल बोडणे, अध्यक्ष, शहर काँग्रेस कमिटी, नवरगाव






