स्मिता मांजरेकर, मुंबई: महामिनिस्टरच्या विजेत्या लक्ष्मी ढेकणे सांगतात की, महामिनिस्टर झाल्यामुळे खूप छान वाटतंय. शब्द सुचत नाहीयेत. इतका आनंद होतोय. सगळे जण माझे कौतुक करत आहेत. खरंतर माझी सासू मला नेहमी म्हणायची की, तू होम मिनिस्टरमध्ये सहभागी हो. त्यांना आपल्या घरी बोलव. मात्र कसं बोलवायचं माहित नव्हतं. पण महामिनिस्टरची जाहिरात टीव्हीवर पाहिली. तेव्हा माझ्या सासूबाई बोलल्या की, तू महामिनिस्टरमध्ये तरी जा. मला घरच्या सगळ्यांनीच प्रोत्साहन दिलं. पण शेवटच्या क्षणापर्यंत माझं या शोमध्ये सहभाही होण्याबाबत काही ठरलेलं नव्हतं. पण माझे पती मला ऑडिशनच्या हॉलमध्ये घेऊन गेले. तिथे लगेच माझा दहा-बारा जणींसह ग्रुप झाला. ऑडिशन राऊंडला आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर तीस सेकंदात द्यायचं होतं. वातावरणातल्या अतिरिक्त किरणांपासून कोणता वायू आपला बचाव करतो ? यात ओझोन वायू हे मी उत्तर दिलं. माझं उत्तर बरोबर आलं. पण नुसतं उत्तर बरोबर येऊन फायदा नव्हता. कारण लकी ड्रॉमधून तिथे प्राथमिक निवड होणार होती. त्यात माझा २३ वा नंबर आला आणि माझी बॅच २०७ आहे म्हटल्यावर मला अधिकच आनंद झाला. त्या राऊंडला ९० जणींची निवड झाली.
मुंबईचा प्रवास
मुंबईत आल्यानंतर प्रवास इतका सुंदर झाला आहे की, झी मराठीच्या संपूर्ण टीमने आम्हाला खूप सहकार्य आणि प्रोत्साहन दिलं. मुंबईत आल्यानंतर पाच-पाच जणींचे आमचे पंधरा ग्रुप झाले. पंधरा ग्रुपमधील प्रत्येकीच्या गमतीजमती, उखाणे, मेमरी राऊंड अशा खेळीमेळीमध्ये पुढचे राऊंड रंगले आणि पहिल्याच भेटीत बांदेकरांनी आम्हाला हसत हसवत या शोमध्ये अधिकच पुढे जाण्यासाठी प्रेरित केलं. आदेश बांदेकर यांच्यासमोर आपण बसलो आहोत याची अनुभूती मी ‘याची देही याची डोळा’ अनुभवली. त्या राऊंडमधून आम्हा १५ जणींची निवड झाली. त्यानंतर पहिल्या खेळात एक ग्रुप बाहेर पडला. मग आमच्या पाच-पाच जणींचे दोन ग्रुप झाले आणि प्रश्न उत्तराच्या राऊंडमध्ये मी दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिले. त्यामुळे आमचा ग्रुप पुढे गेला.
जिंकेन असं वाटलं नव्हतं
मला अपेक्षित नव्हतं, की मला हा महामिनिस्टरचा किताब मिळेल किंवा मी ही ११ लाखांची पैठणी जिंकेन. कारण इतर स्पर्धकही खूप हुशार होत्या. माझा स्वभाव थोडा शांत आहे. त्यामुळे मी जिंकेल असं स्वप्नवत होते. मी जिंकल्यानंतर अख्खा रत्नागिरीला आनंद झाला. कुटुंब, मित्रपरिवार नातेवाईक सगळ्यांनी माझं कौतुक केलं. खरंतर मी कधीच टीव्हीवरसुद्धा आले नसते. पण झी मराठीमुळे मला ही संधी मिळाली. पहिल्या दिवशी तर प्रत्येक महिला त्या त्या सेंटरच्या महामिनिस्टर होत्या. त्यामुळे प्रत्येकीमध्ये एक अभिमान होता. सुरुवातीचे पाच मिनिट एकमेकींकडे आम्ही बघत सुध्दा नव्हतं. मी माझ्या सेंटरची महाराणी असाच फिल होता. पण नंतर आमच्या सगळ्यांमध्ये मैत्री झाली. शेवटच्या दहा जणींमध्ये कुठेही आपापसात स्पर्धा किंवा जलसी नव्हती.
अंगभूत गुणांचा कस लागणारा खेळ
बुद्धीमत्ता आणि चपळता या दोन्हींची सांगड घालत मी महामिनिस्टर झाली. त्यांनी ज्या पद्धतीचे खेळ ठेवले होते. त्यात या दोन्ही गुणांचा कस लागणार होता. पहिल्या राऊंडमध्ये मी त्याचाच वापर केला आणि पुढे गेले. मी खूप शांततेने खेळले. देवाची कृपा, दडपण नाही आले. समोरच्या सूचना नीट ऐकायच्या आणि खेळायचं हे मी यातून शिकले. सुरुवातीला मी आजूबाजूंच्या स्पर्धकांकडे पाहात राहायचे. त्यांचा ट्रॅक बघायचे. त्या काय करत आहेत ? त्यापुढे गेल्या. हे पाहायचे. पण नंतर लक्षात आलं की, कोण काय करते ? याकडे नाही पाहायचं. मी नियमात खेळते आहे ना ? मग घाबरायचं नाही फक्त स्पीड वाढवण्यावर आणि विचारपूर्वक खेळण्यावर भर दिला.
अंतिम स्पर्धेची चुरस
फायनलला खूप चढाओढ झाली. खूप अटीतटीचा सामना झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. खूप सस्पेन्स होता. कोण जिंकेल? काही कळत नव्हतं. इथपर्यंत आली आहे आता बाहेर पडेल? की मी जिंकेल? असे अनेक भाव मनात दाटून येत होते. पण विजेती म्हणून माझं नाव जाहीर झालं आणि मी आनंदाने नाचायला, उड्या मारायला लागले. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. पैठणी हातात आल्यावर भारीच वाटलं. ज्यांनी ती पैठणी बनवली आहे. त्यांचे मी हातात हात घेतले आणि मी त्यांचे आभार मानले. पैठणी वजनाला खूपचे हलकी आहे.
पैठणीची काळजी घेताना…
हिरेजडीत आणि सोन्याची जर असलेली या पैठणीची काळजी घेताना कापसे यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं. ही पैठणी प्लास्टिकमध्ये बांधून ठेवायची नाही. सुती कपड्यात बांधायची आणि महिन्यातून एकदा ती उघडी करून ठेवायची. तिला हवा लागली पाहिजे. त्याच्यावर परफ्यूम जराही मारायचा नाही.आता बरेच जण ही पैठणी बघायला येतात. त्यामुळे मी त्याला छान कव्हर केलं आहे. सोन्याची जर आणि हिरे पटकन कोणालाही दिसतील अशा पद्धतीने मी आता ती ठेवली आहे. त्या पैठणीचे फोटो काढले आहेत. प्रत्येकाला ती पैठणी उघडून दाखवली तर ती खराब होईल. त्यामुळे तिची विशेष आता काळजी घेत आहे. माझा घरचा गणपती आणि दिवाळीला मी ही पैठणी आवर्जून घालणार.
नोकरी आणि घर
मी कृषी खात्यात नोकरीला आहे. वरिष्ठ लिपिका म्हणून मी काम करते. माझ्या पतींचा रत्नागिरीतच सोलारचा व्यावसाय आहे. रत्नागिरी शहरातच मी राहते. माझं मूळ गाव लांजा तालुक्यात शितोशी हे आहे. माझं माहेर सावंतवाडीचं. मी बीएसएसी केमेस्ट्री केलं आहे.
सुनेला पैठणी देणार
आता ही माझी खानदानी पैठणी झाली आहे. एवढी महाग पैठणी मी कधी घेतली असती ? सव्वालाखाची पैठणी असती तरी मी ती खूप जपून माझ्या पुढच्या पिढीपर्यंत ठेवली असती. मला एक मुलगा आहे त्यामुळे माझ्यानंतर माझ्या सुनेला मी ही पैठणी देणार. माझ्या पतींनी आजवर मला एकही पैठणी गिफ्ट म्हणून दिली नाही. ही माझी पहिलीच पैठणी आहे. माझ्या पतींनी माझ्यासाठी काही आणलं की, मी त्यांना म्हणायची की, हा रंग असा का आणला? अमूक का नाही आणलं. तेव्हापासून त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट आणायचं सोडून दिलं. पण या खेळासाठी त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं.
आणखी गेम शोमध्ये भाग घेणार
भविष्यात मी अशा शोमध्ये नक्की भाग घेणार. जिथे बुद्धीमत्तेचा कस लागेल तिथे आपण जायला पाहिजे. आपण जात नाही ही चूक करतो. आता मी याशोमध्ये सहभागी झाले नसते तर इथपर्यंत येऊन पोहोचले नसते.
आदेश बांदेकरांनी प्रोत्साहन दिलं
आदेश बांदेकर माझ्याशी बोलताना पूर्णत: सावंतवाडीतच्या आठवणीत रमून गेले. त्यांच्या आईचं माहेर सावंतवाडी. त्यामुळे सगळ्या गप्पांमधून त्यांच्या अनेक परिचयाची माणसं त्यांना आठवली. खेळातही त्यांनी सगळ्यांनाच प्रोत्साहन दिलं.