Marathi actor Bhushan Kadu was kidnapped in Pune entertainment news
पुणे : मराठी सिनेविश्वामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये भूषण कडूचे नाव प्रामुख्याने येते. चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका अशा सर्वच माध्यमातून भूषण कडूने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आपल्या हास्यविनोदाने आणि त्याच्या टायमिंगमुळे मराठी मनोरंजन क्षेत्रात भूषणने आपली ओळख निर्माण केली. मात्र मागील काही वर्षे भूषणच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग येऊन गेले आहेत. याबाबत त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नटाच्या आयुष्यात करोना काळात मात्र मोठे संकट कोसळले होते. यावेळी त्याच्या पत्नीचे देखील निधन झाले. यामुळे भुषण कडू हा अधिक खचला गेला आणि नैराश्यामध्ये गेला. अभिनेता भुषण कडूच्या आयुष्यातील या कठीण काळाचा तो सामर्थ्याने सामना करत होता. मात्र यामुळे तो बराच काळ सिनेविश्वापासूनही दुरावाला. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना त्याने आणखी एका कठीण प्रसंगाला तोंड दिल्याचे सांगितले. तसेच पुण्यामध्ये भूषण कडूचे अपहरण झाले होते असा धक्कादायक खुलासा देखील भुषण कडू याने केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भूषणने एका वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्य आणि सिनेविश्वातील अनुभवांबाबत सांगितले आहे. तसेच कठीण प्रसंग देखील सांगितले आहेत. भूषणने एका मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला की, पुण्यात त्याचे अपहरण झाले होते आणि त्याला तीन दिवस डांबून ठेवण्यात आले होते. हा धक्कादायक प्रसंग सांगताना कडू म्हणाला की, ‘जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा, कुठेतरी काहीतरी आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. त्याची आपल्याला कुणकुण नसते. मला किडनॅप पण करण्यात आलं होतं. तीन दिवस पुण्यात किडनॅप करुन ठेवण्यात आलं होतं.’ असा धक्कादायक खुलासा भूषण कडू याने केला.
या अपहरणाच्या विचित्र आठवणी सांगताना त्याने कलाकाराच्या कलेचा मान राखला गेला हे सांगितले. तो म्हणाला की, ज्या माणसाने सुपारी दिली होती त्याने एकाला सांगितलं होतं की याला मध्ये मध्ये मारत राहा, पण त्याने मला नाही मारलं. तो हाताने आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मी त्याला मारतोय. कारण तो माणूस मला भूषण कडू म्हणून ओळखत होता. तो म्हणाला की, सर मी तुम्हाला मारु शकत नाही. तुम्ही कलाकार आहात. मी तुमचं काम बघतो. माझी मुलंही तुमची कामं बघतात.’ असे अभिनेता भूषण कडू याने सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठी प्रेक्षकवर्गासाठी भूषण कडू हे अत्यंत ओळखीचे आणि लोकप्रिय नाव आहे. ‘घडलंय बिघडलंय’ने त्याला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्याचबरोबर भूषण कडूने सात वर्षे ‘कॉमेडी एक्सप्रेस’ हा शो जबरदस्त गाजवला. टीव्हीवरील या शोमुळे भूषण घराघरांमध्ये गेला. तसेच त्याने अभियनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील घर केलें अभिनेता भूषण कडू याने ‘बिग बॉस मराठी’चा पहिला सीझनही गाजवला होता. तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात झळकला होता. करोना काळात त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्यानंतर तो काही काळ सिनेविश्वापासून लांब गेलेला दिसून आला.