(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा एक अविस्मरणीय क्षण नुकताच घडला आहे. भारत माता चित्रपटगृह तब्बल सहा वर्षांच्या खंडानंतर नव्या रूपात, नव्या दिमाखात पुन्हा सुरू झाले आणि या ऐतिहासिक पुनरागमनाचा मान मिळाला तो ‘सुपर डुपर’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाला. या विशेष क्षणाचे औचित्य साधत चित्रपटाचा भव्य प्रीमियर सोहळा अत्यंत जल्लोषात आणि मराठमोळ्या थाटात पार पडला.
ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक सजावटीत आणि उत्साही वातावरणात रंगलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे केले. मराठी संस्कृतीचा अभिमान आणि चित्रपटाचा उत्सव अशा दुहेरी स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, फिल्म सिटी कॉर्पोरेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश कुमार बन्सल, झी स्टुडिओज मराठीचे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर, तसेच चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आशिष शेलार यांनी ‘भारतमाता’शी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख करत सांगितले की, हे चित्रपटगृह त्यांच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे. “हे केवळ थिएटर नसून अनेक पिढ्यांच्या आठवणींचा जिवंत ठेवा आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सिंगल स्क्रीन थिएटर टिकवून ठेवण्यासाठी प्रेक्षकांनी पाठिंबा देण्याचे आवाहनही केले.
चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनीही या सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त करत सांगितले की, ‘सुपर डुपर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आनंद, प्रेम आणि उत्साह घेऊन येत आहे. तर झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी ‘भारतमाता’सारख्या ऐतिहासिक थिएटरमध्ये प्रीमियर होणे ही मोठी संधी असल्याचे सांगत, या चित्रपटामुळे नवा इतिहास घडेल असा विश्वास व्यक्त केला.
अभिनेत्री निर्मिती सावंत यांनीही आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, ‘भारतमाता’ थिएटर हे त्यांच्यासाठी माहेरासारखे आहे. लहानपणापासून या थिएटरशी जोडलेल्या आठवणींमुळे या ठिकाणी आपल्या चित्रपटाचा प्रीमियर होणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “माझं माहेर इथेच बीडीडी चाळीत असल्यामुळे ‘भारतमाता’ हे माझ्यासाठी माहेरचंच थिएटर आहे. लहानपणापासून इथे येऊन चित्रपट पाहाणं हा आमचा एक खास छंद होता. आज खूप आनंद होत आहे की, या चित्रपटगृहाची नव्याने पुनर्बांधणी झाल्यानंतर माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरने त्याचं उद्घाटन होत आहे. ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.”
दंड भरण्यास नकार; पैसे देण्याऐवजी तुरुंगात जाण्यास राजपाल यादव तयार, उच्च न्यायालयाचा निकाल राखीव
झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा चित्रपट ३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, तो एक कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले असून, निर्मिती विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी केली आहे. उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर हे प्रस्तुतकर्ते असून, छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी सांभाळली आहे.
एकंदरीत, ‘भारतमाता’ चित्रपटगृहाच्या पुनरागमनासोबत ‘सुपर डुपर’च्या प्रीमियरने मराठी चित्रपटसृष्टीत नवचैतन्य निर्माण केले आहे. परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा सोहळा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला आहे.






