
अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? चित्रपटाचे 50 दिवस पूर्ण
मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, जालना आणि जळगावसह अनेक शहरांमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली गर्दी होत असून त्याची लोकप्रियता कायम असल्याचे दिसून येत आहे. कुटुंबातील नातेसंबंध, भावनिक प्रसंग आणि हलक्या-फुलक्या मनोरंजनाचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
Salman Khan on Kabir Bedi : सलमानने सांगितलं “भारताचे ओरिजिनल टायगर” कोण? इतिहास ५० वर्षांपूर्वीचा
चित्रपटात निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे यांच्या भूमिका विशेष चर्चेत आहेत. सासू-सून नात्यातील भावनिक आणि विनोदी पैलू या दोघींनी प्रभावीपणे साकारले आहेत. त्यांच्या सहज अभिनयामुळे प्रेक्षकांना पात्रांशी भावनिक नाळ जोडता आली असून अनेकांनी चित्रपट पाहताना हसत-हसत आणि काही प्रसंगांमध्ये भावूक होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले, “अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? गौरवशाली ५० वा दिवस साजरा होत आहे, याचा अत्यंत आनंद होत आहे. कारण, माझं नेहमी एकच म्हणणं असतं की, बाई जर घर चालवू शकते तर नक्कीच चित्रपटही चालवू शकते. माझ्या स्त्रीप्रधान चित्रपटांना जो अभूतपूर्व प्रतिसाद रसिकप्रेक्षकांनी दिला त्याबद्दलचं एक दडपण असताना देखील वेगळा विषय, सासू-सूनेबद्दलच्या भावभावना वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा माझा प्रयत्न होता आणि या प्रयत्नांना अत्यंत सुखद आणि आनंददायक यश प्रेक्षकांकडून मिळालं. त्यामुळे मी प्रेक्षकांचा कायमचा ऋणी आहे आणि या यशाने एक जाणीव होते की, यापुढे अधिक चांगलं काम केलं पाहिजे.”
दरम्यान, Zee Studios मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही प्रेक्षकांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. भावनिक आशय आणि मनोरंजनाची जोड असलेल्या चित्रपटांना प्रेक्षक नेहमीच पसंती देतात, हे या चित्रपटाने पुन्हा एकदा सिद्ध केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओंकार मंगेश दत्त यांनी लिहिले असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. कुटुंबातील नात्यांची भावनिक मांडणी आणि मनोरंजनाची सांगड यामुळे हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे.