(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल असा धमाल मनोरंजनाचा खजिना घेऊन येणारा ‘सुपर डुपर’ चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. नावाप्रमाणेच ‘सुपर डुपर’ हा ट्रेलरही तितकाच मजेशीर, रंगतदार आणि मनोरंजनाने भरलेला आहे. एकापेक्षा एक दमदार कलाकारांची उपस्थिती आणि त्यांच्यातील भन्नाट केमिस्ट्रीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी ‘पैसा वसूल’ ठरणार, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा गमतीशीर आणि गोंधळाने भरलेला प्रवास दाखवण्यात आला आहे. एका बाजूला पारंपरिक विचारसरणी जपणारं गावाकडचं कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक जीवनशैली स्वीकारलेलं शहरातलं तरुण जोडपं, या दोन्ही टोकाच्या व्यक्तिमत्त्वांची एकाच घरात झालेली टक्कर हा चित्रपटाचा मुख्य गाभा आहे. एकाच फ्लॅटची दोघांना विक्री झाल्यामुळे निर्माण होणारा वाद, त्यातून उभे राहणारे विनोदी प्रसंग आणि एकमेकांशी जुळवून घेताना होणारी त्यांची मजेशीर जुगलबंदी ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे.
या सगळ्या गोंधळातही नात्यांची ऊब आणि भावनिक बाजू अधोरेखित करणारा संवाद विशेष लक्ष वेधून घेणारा आहे. “झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच.” हा संवाद चित्रपटाच्या कथानकाला एक हृदयस्पर्शी दिशा देत आहे. त्यामुळे हा चित्रपट केवळ हसवणारा नाही, तर नात्यांमधील भावनिक गुंतागुंतही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडणारा आहे, हे स्पष्ट होतं आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं असून, त्यांनी विनोद आणि भावना यांचा सुंदर समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर छायांकनाची जबाबदारी संजय जाधव यांनी पार पाडली आहे, ज्यामुळे चित्रपटाची दृश्यरचना अधिक प्रभावी बनली आहे.
कलाकारांच्या फळीबाबत बोलायचं झालं, तर निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासोबतच ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या सगळ्या कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळणार आहे.
‘आज मी अनाथ झालोय…’ Anurag Dobhal चा धक्कादायक खुलासा; ICU मधून बाहेर पडताच शेअर केली पोस्ट
दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘सुपर डुपर’ हा फक्त विनोदी चित्रपट नसून नात्यांमधील गमतीजमती आणि त्यामागची भावना यांचा प्रवास आहे. दोन भिन्न स्वभावाची कुटुंबं एकत्र आल्यावर निर्माण होणाऱ्या प्रसंगांना हलक्या-फुलक्या शैलीत सादर करताना प्रेक्षकांना हसवण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडणारा हा चित्रपट ठरणार आहे. ३ एप्रिलपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्यासाठी ‘सुपर डुपर’ एक परफेक्ट एंटरटेनमेंट पॅकेज ठरेल, यात शंका नाही.






