(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित सादर होत असलेल्या ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक अत्यंत प्रभावी आणि वेधक नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरमधून चित्रपटाच्या भव्यतेची आणि भावनिक गाभ्याची झलक पाहायला मिळते आहे. साधेपणातही ताकद असलेले हे पोस्टर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील तेज, धैर्य आणि जाज्वल्य स्वराज्याची भावना अत्यंत प्रभावीपणे प्रकट करते. विशेष म्हणजे, या पोस्टरद्वारे चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित राजा शिवाजी अँथम “छत्रपती” ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हे अँथम येत्या सोमवारी म्हणजेच १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
मोनालिसाचं आता काय खरं नाही..! तपासात धक्कादायक खुलासा; पती फरमान खानवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल
‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशी तिहेरी जबाबदारी अभिनेता-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख यांनी समर्थपणे सांभाळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ते प्रेक्षकांसमोर एक वेगळ्या आणि दमदार अवतारात दिसणार आहेत. चित्रपट रिलीजआधीच प्रदर्शित करण्यात आलेल्या काही झलकांमधून (glimpses) शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण टप्पे, युद्धनीती, आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष यांची झलक पाहायला मिळाली होती, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
या चित्रपटातील राजा शिवाजी अँथम “छत्रपती” विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गीताला संगीतबद्ध केले असून त्यांनीच ते गायले आहे. यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या मुख्य गीताचा काही भागाने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून, या संपूर्ण अँथममध्ये त्यांच्या भव्य, ऊर्जा देणाऱ्या आणि भावनांना स्पर्श करणाऱ्या शैलीचा प्रत्यय येणार आहे. मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी तयार केलेले हे गीत प्रेक्षकांना थरार आणि प्रेरणेचा एक अनोखा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.
‘राजा शिवाजी’ मध्ये तगडे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश विलासराव देशमुख यांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांच्या प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाची उंची आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि वारसा यावर आधारित हा भव्य ऐतिहासिक महाकाव्यपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
भारतीय इतिहासातील एका सुवर्णयुगाची गाथा मोठ्या पडद्यावर भव्यतेने उलगडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून, तो स्वराज्याच्या प्रेरणेचा, पराक्रमाचा आणि अभिमानाचा उत्सव ठरणार आहे. नवीन पोस्टर आणि आगामी अँथम “छत्रपती” च्या घोषणेमुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली असून, प्रेक्षक आता या भव्य कलाकृतीच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.






