अनेक भाव – भावनांच्या विश्वाचे प्रवेशव्दार असलेल्या थिएटरशी सिनेरसिकांचे एक भावनिक नाते तयार होते. कोणता चित्रपट कोणत्या सिनेमागृहात पाहिला, हे आठवणीने सांगणारे रसिक असतात, तसेच आपला कोणता चित्रपट कोणत्या थिएटरमध्ये किती आठवडे चालला, याची खडानखडा माहिती ठेवणारे काही अभिनेतेही असतात. चित्रपटगृहाच्या काळ्यामिट्ट अंधारात रसिक आपल्या स्वप्नांच्या गावी पोहचलेला असतो आणि खऱ्या आयुष्याशी पूर्णपणे विसंगत असलेलं पण आनंद देणारं आयुष्य तीन तासांसाठी का असेना पण जगलेला असतो. त्यामुळेच चित्रपटगृह, थिएटर ही केवळ एक निर्जीव वास्तू नसते, तर त्या वास्तूशी अनेकांचे भावबंध जुळलेले असतात. अशा अनेक रसिकांच्या, अभिनेते, अभिनेत्रींच्या भावबंधाच्या ढिगाऱ्यांवर आज या मायानगरीत मॉल्सचा झगमगाट दिसतोय. या झगमगाटाच्या पायाशी असलेल्या वास्तू अजुनही मुंबईकरांच्या विस्मरणात गेलेल्या नाहीत आणि त्या वास्तूसारखे भावबंध मल्टीप्लेक्सशी जुळलेले नाहीत.
गोल्डन ज्युबली, सिव्हर ज्युबली, फर्स्ट डे फर्स्ट शो अशा सिनेमांचा तो काळ. मुंबईतील अनेक थिएटर्सनी सिनेमांच्या घवघवीत यशाचं वैभव अनुभवलं आहे. पण मुंबईत एक काळ गाजवणाऱ्या या थिएटरच्या आज खाणाखुणादेखील मिळत नाहीत. अनेक थिएटरच्या जागी आज शॉपिंग मॉल दिमाखात उभे आहेत किंवा गगनचुंबी इमारत बांधण्यात आले आहेत. आज बंद पडलेल्या थिएटरच्या जागी जरी शॉपिंग मॉल उभे राहिले असले तरी त्याठिकाणी अनेक स्टार्संना फिरकावंसदेखील वाटत नाही. याबाबत अभिनेते सचिन पिळगांवकर ‘नवराष्ट्र’शी बोलताना म्हणाले की, अंधेरीतील अंबर, ऑस्कर आणि मायनॉर या थिएटरच्या जागी आता शॉपिंग मॉल उभं राहिलं आहे. पण मी तिथे शॉपिंगला फिरकतसुध्दा नाही. कारण तिथे माझ्या अनेक जुन्या सिनेमांच्या आठवणी आहेत. ‘अंबर ऑस्कर मायनॉर’मध्ये माझ्या अनेक सिनेमांनी घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर त्या सगळ्या सोनेरी आठवणी अक्षरश: दाटून येतात. आता तिथे मॉल उभा राहिलेला पाहून मन थोडसं दु:खी होतं.
चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर याबाबत सांगतात की, मी सिंगल स्क्रीन थिएटरचा जुना काळ जवळून पाहिला आहे. गिरगावातला मॅजेस्टिक सिनेमा १९७२ साली पाडला आणि त्या जागी एक मोठी इमारत उभी राहिली. त्यापाठोपाठ दादर टीटी येथील ब्रॉडवे थिएटर पाडलं आणि तिथे ब्रॉडवे शॉपिंग मॉल आला आणि मग थिएटर पाडण्याची सुरुवातच झाली. त्यानंतर ८० च्या दशकात रंगीत टीव्ही आणि व्हिडिओ व्हिसीआर आला. त्यामुळे थिएटरला त्याचा फटका बसला आणि त्याच दशकात एक एक थिएटर बंद होत गेली. पण गेल्या काही वर्षात त्याला खूपच वेग आला. श्रीसारखी थिएटर बंद झाली. त्यांच्या आता खाणाखुणादेखील मिळणार नाहीत. गेल्या शंभर वर्षात रॉक्सी थिएटर तीन वेळा बंद झालं आणि तिसऱ्यांदा पाडलं तेव्हा त्यात एक थिएटरपण आलं आणि तिथे एक इमारत उभी राहिली. दादरचं कोहिनूर थिएटर पाडलं आणि तिथे नक्षत्र मॉल उभा राहिला. ड्रिमलँड थिएटरच्या जागी मॉल येतोय अशी बातमी आली. शालीमार थिएटर बंद झालं. आता तिथे लग्नाचे समारंभ होतात. अप्सरा थिएटरच्या जागी नवीन ऑफिस आले. गंगा जमना जमीनदोस्त झालं. डायना, मिर्नव्हा, नॉव्हेल्टी, नाझ थिएटर बंद झालं. एम्पायर थिएटर बंद झाल्यात आहे.
अजंठा थिएटर पाडलं तिथे मॉल आला. बोरिवलीचं जया टॉकिज बंद झालं. स्वस्तिक थिएटरच्या आधी तिथे पाथे थिएटर होतं ते बंद झालं. त्यानंतर स्वस्तिकपण बंद झालं. त्या थिएटरच्या जागी आता तिथे मोठी इमारत आहे. अंधेरीतील अंबर, ऑस्कर, मायनॉर ही तीन थिएटर पाडली गेली. तिथे शॉपर्स स्टॉप उभं राहिलं. चंदन, न्यू टॉकीज बॅंड्रा ही एककाळ गाजवणारी थिएटर कालौघात बंद झाली. नंदी टॉकीज बंद पडलं. तिथे काहीच आलं नाही. राम और श्याम थिएटरच्या जागी मॉल आला. ही सगळी थिएटरर्स बंद पडण्याचं मुख्य कारण म्हणजे मुंबईत जागेची किंमत वाढली. त्यामुळे थिएटरची जागा विक्रीतून फायदा मिळायला लागला. दुसरं कारण मल्टिप्लेक्समध्ये स्क्रीनची संख्या सिंगल थिएटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे तिथे जास्त नफा मिळतो. तसंच सध्या कोरोनाच्या काळात थिएटर चालवणंसुध्दा मुश्कील आहे. कारण थिएटरला प्रेक्षकवर्ग नाही.