सौजन्य- सोशल मीडिया
Digpal Lanjekar Poem On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि कॉन्ट्रॅक्टर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा राजकारणातूनच नाही तर सोशल मीडिया आणि मनोरंजनविश्वातूनही निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेचा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत निषेध व्यक्त केला आहे. अशातच नुकताच शिवराज अष्टकची निर्मिती करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी एक भावुक कविता शेअर केली आहे.
मराठमोळे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी एक इन्स्टा रिल शेअर केली आहे. त्या रिलमध्ये महाराज आसनस्थ दिसत आहेत. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये कविता लिहिली आहे.
“क्षमा धनी…
गलबलला दर्या,
त्याचे अश्रू कुणा दिसेना
बाप कोसळता माझा,
वेदना उरी ती मावेना
चूक कुणाची कुणाची,
सारे भांडती भांडती
पण भाव स्वराज्याचा,
बघा सारेच सांडती
रे माझ्या बापा शिवराया
तुमच्यासाठी उरे काया
नको मूर्ती ती लौकिक
नको स्मारक भौतिक
देवा शक्ती द्या लेकरा
तव कवतिक सांगाया
तव पराक्रमाचा तो
दीप लागू दे तेवाया
श्वास माझा हो संपू दे
तुमची स्मृती ती कोराया
मनामनाच्या अंतरी
तुमची मूर्ती साकाराया”
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची कविता चाहत्यांना प्रचंड भावली आहे. “कविता वाचताना डोळ्यात पाणी आलं, राजं खरंच माफ करा…”, “राजं, तुमची खरी स्मारकं म्हणजे तुमचे गडकिल्ले आहेत. त्याला जर गतवैभव दिलं तर आम्ही सर्व जगाला सांगू की आमचा राजा कोण होता ते.”, “भावना, आदर, स्वाभिमान”, “माफी असावी राजे” शिवाय अनेक चाहत्यांनी “जय शिवराय” अशीही कमेंट केलेली आहे. दिग्पाल लांजेकर यांच्याबद्दल सांगायचे तर महाराजांच्या पराक्रमावर आधारित शिवराज अष्टकची निर्मिती यांनी केलेली आहे. दिग्पाल यांनी दिग्दर्शन केलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.