मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे काल रात्री निधन झाले. त्यांनी रात्री १ वाजता विलेपार्ले पूर्व इथल्या राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला असून आज दुपारी त्यांचे अंत्यविधी होणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटांमध्येही एकापेक्षा एक भूमिका साकारून प्रेक्षकांवर छाप पडली. सरफरोश, गांधी, वास्तव अशा अनेक हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका लोकांच्या अजूनही लक्षात आहेत. तसेच निवडुंग (1989), मधुचंद्राची रात्र (1989), जसा बाप तशी पोर (1991), ईश्वर (1989), नरसिम्हा (1991)सह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. मागील काही काळापासून ते मनोरंजन सृष्टीपासून दूर होते.
मुंबईतल्या पारशीवाडा इथल्या हिंदू स्मशान भूमीत सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुलं ऋषिकेश आणि ओमकार, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त होत आहे.