भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य मासेप्रेमी आहेत. माशांची चव जितकी सुंदर लागते तितकेच मासे सुद्धा शरीरासाठी गुणकारी असतात. निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी डॉक्टरसुद्धा दैनंदिन आहारात मासे खाण्याचा सल्ला कायमच देतात. माशांमध्ये आवश्यक प्रथिने आणि चांगले फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पण मासे खरेदी करताना त्यांची गुणवत्ता जाणून घेणे फार आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा मार्केटमध्ये गेल्यानंतर शिळे किंवा निकृष्ट दर्जाचे मासे घरी विकत आणले जाते. शिळ्या माशांमुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे मासे खरेदी करताना ते ताजे आहेत की नाही हे पाहावे. (फोटो सौजन्य – istock)
ताजे मासे विकत घेताना अजिबात करू नका 'या' चुका, जाणून घ्या चांगले मासे खरेदी करण्यासाठी सोप्या टिप्स

ताजे मासे ओळखण्यासाठी सगळ्यात आधी त्यांचे डोळे पहावेत.माशांचे डोळे जर चमकदार आणि थोडे पारदर्शक असतील तर मासे फ्रेश आहेत. पण डोळे निस्तेज आणि खोलवर आतमध्ये गेले असतील तर मासे शिळे आहेत.

बर्फात साठवून ठेवलेल्या माशांची त्वचा कोरडी किंवा रंगहीन होऊन जाते. तसेच काहीवेळा मासे खूप जास्त मऊ होतात आणि आतील मांस पूर्णपणे बाहेर पडते. असे मासे अजिबात खरेदी करू नये.

माशाचे कल्ले हे त्यांचे ताजेपणाचे वैशिष्ट्य मानले जातात. ताज्या माशांमध्ये कल्ले लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात. पण जुन्या किंवा शिळ्या झालेल्या माशांचा रंग तपकिरी आणि निस्तेज होऊन जातो.

माशांची खरेदी करताना वासाकडे दुर्लक्ष करू नये. ताज्या माशांच्या वासात आणि शिळ्या वासात खूप जास्त फरक असतो. त्यामुळे मासे खरेदी करताना त्यांना घाणेरडा वास येत असेल तर माशांची खरेदी करू नये.

माशांचे स्वरूप, वास, कल्ल्यांचा रंग आणि शारीरिक स्थिती यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देऊनच माशांची खरेदी करावी. शिळे मासे शरीराला हानी पोहचवतात.






