हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात सतत बदल होत असतात. दमट वातावरणामुळे साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. अशावेळी आहारात गुळाचा समावेश करावा. गूळ खाल्ल्यामुळे शरीरात उबदारपणा कायम टिकून राहतो आणि रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. गूळ हा पारंपरिक आहे. जेवणातील पदार्थ बनवताना साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात गूळ खाल्ल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
हिवाळ्यात जेवणानंतर करा गुळाचे सेवन, शरीरातील उबदारपणा टिकून राहण्यासोबतच रहाल कायमच फिट

ऊसापासून गूळ तयार केला जातो. यामध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी गुणकारी ठरतात. थंडीच्या दिवसांमध्ये आहारात गुळाचा समावेश करावा. यामुळे शरीरात उष्णता टिकून राहते.

गुळाची प्रकृती उष्ण मानली जाते. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळच्या नाश्त्यात चणे आणि गूळ एकत्र मिक्स करून खावे.

जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्यास खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते आणि अपचनाच्या समस्या उद्भवत नाहीत. गॅस, अपचन तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गूळ खावे.

शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गूळ खावे. नियमित गूळ खाल्ल्यास रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुलभ होते.

हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि संसर्गाचा धोका वाढतो. अशावेळी गूळ खाल्ल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. गुळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती सुधारतात.






