Chandrapur News: वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी इको ब्रिज, पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!
नागभीडपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर वन्यजीवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. घोडाझरी अभयारण्य हे ताडोबा-ब्रह्मपुरी वन्यजीव कॉरिडॉरचा भाग असल्याने या जंगल परिसरातून वाघ, बिबट, अस्वल, हरीण, रानडुक्कर, ससा यांसह विविध वन्यप्राण्यांचा नियमित वावर असतो. (फोटो सौजन्य – AI Created)
जंगलातून जाणाऱ्या महामार्गामुळे वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता असते. हे अपघात टाळण्यासाठी शासनाने या मार्गावर इको ब्रिज तसेच वन्यजीव अंडरपास उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाची गती पाहता वन्यजीव संरक्षणाचा उद्देशच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. कामासाठी रस्त्याचा काही भाग अर्धवट खोदून ठेवण्यात आला आहे.
ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना धुळीमुळे आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा या मार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत असताना रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक बनते.
अपूर्ण रस्त्याचा अंदाज न आल्यास वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुरेशा सूचना फलकांचा आणि रात्री स्पष्ट दिसणाऱ्या रेडियम पट्ट्यांचा अभाव असल्यास धोका आणखी वाढू शकतो. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी हाती घेण्यात आलेले कामच प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित वनविभाग आणि बांधकाम यंत्रणेने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
इको ब्रिजचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. तोपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करावी. आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेट्स आणि रेडियम पट्टे लावावेत, अशी मागणी या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांचा सुरक्षित प्रवास या दोन्ही बाबी महत्त्वाच्या असताना इको ब्रिजच्या कामाला गती कधी मिळणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






