'रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांपासून दूर राहा' ही म्हण तुम्ही कायमच ऐकली असेल. घरातील वयस्कर व्यक्तींपासून ते अगदी पालकसुद्धा नियमित सगळ्यांचं सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंद तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर खाऊ शकता. सफरचंद हे केवळ फळ नसून शरीरासाठी वरदान आहे. यामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. दररोज एक ताजे सफरचंद खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यासोबतच त्वचा आणि केसांना सुद्धा भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सफरचंद खाण्याचे गुणकारी फायदे. (फोटो सौजन्य – istock)
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी

सफरचंदमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच आतड्यांची हालचाल सुलभ राहते. वारंवार ऍसिडिटी किंवा गॅसची समस्या उद्भवत असेल तर सफरचंद खावे.

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी महागडे डाएट किंवा दीर्घकाळ उपाशी राहण्यापेक्षा नियमित एक सफरचंद खावे. सफरचंद खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही.

सफरचंद शरीराचे रक्षण करते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

लहान मुलांना सफरचंदची साल काढून खाण्यास दिले जाते. मात्र असे न करता सालीसहित सफरचंद खाण्यास द्यावे. यामुळे सालीमधील आवश्यक घटक मुलांच्या शरीरात जातात.

गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाणे आवश्यक आहे. यामुळे आजारांपासून तुम्ही दूर राहाल आणि कायमच हेल्दी राहाल.






