बाजारात भाजी आणायला गेल्यानंतर चिंच किंवा फळ विक्रेत्याच्या गाडीवर स्टार फ्रुट दिसून येते. या फळाला करमर असे सुद्धा म्हणतात. हे फळ चवीला अतिशय आंबटगोड असते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं करमर खायला खूप आवडत. हे फळ कापून मीठासोबतच खाल्यास तोंडाची बिघडलेली चव सुधारते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला करमर म्हणजे स्टार फ्रुट खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळाच्या सेवनामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.(फोटो सौजन्य – istock)
आंबट गोड चवीचे स्टार फ्रुट आरोग्यासाठी ठरेल गुणकारी
स्टार फ्रुटमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व 'सी' आढळून येते. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी स्टार फ्रूटचे सेवन करावे.
करमरमध्ये फ्लावोनॉइड्स नावाचे अँण्टीऑक्सिडंट्स आढळून येते. यामुळे अचानक पायांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय मेंदूच्या आरोग्यासाठी करमर हे फळ अतिशय प्रभावी आहे.
फायबर युक्त स्टार फ्रूटचे सेवन केल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. या फळांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
स्टार फ्रुटमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी या फळाचे सेवन करावे. पोटावर वाढलेला अतिरिक्त चरबीचा थर कमी करण्यासाठी करमर गुणकारी आहे.
कडक उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी करमर फळाचे सेवन करावे. हे फळ शरीरात पाण्याची पातळी वाढवण्यास मदत करते.