KYC Fraud ही सायबर गुन्हेगारांची फसवणूक करण्याची सर्वात सामान्य आणि जुनी युक्ती आहे. गेल्या काही वर्षांत केवायसी फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. KYC म्हणजेच Know Your Customer. सायबर गुन्हेगार लोकांना फोन करून त्यांची KYC अपडेट करण्यासंबंधित फसवणुक करतात. काही लोक सायबर गुन्हेगारांच्या या बोलण्याला बळी पडतात आणि त्यांची फसवणूक होते. KYC Fraud च्या घटना रोखण्यासाठी बँका त्यांच्या ग्राहकांना नेहमी सतर्क करत असतात. मात्र तरी देखील काही नागरिक या फ्रॉडना बळी पडतात आणि त्यांची मोठी फसवणूक होते.
KYC Fraud: केवायसी फसवणूक रोखण्यासाठी लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या टीप्स (फोटो सौजन्य - pinterest)
केवायसी फसवणुकीत सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील, महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती, महत्त्वाचे लॉगिन तपशील आणि काही संवेदनशील तपशील मिळवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते फिशिंग ईमेल, फेक मेसेज, कॉल्स आणि फेक वेबसाइट्सचा अवलंब करतात.
फसवणूक करणारे एखाद्या कंपनीचे अधिकारी, बँक अधिकारी किंवा कोणत्या तरी संस्थेचे सदस्य असल्याचे भासवून लोकांना फसवतात. यानंतर, वैयक्तिक माहितीशिवाय, ते त्यांच्याकडून इतर अनेक तपशील मिळविण्याचा प्रयत्न करतात.
अनेक वेळा सायबर गुन्हेगार बनावट मोबाईल ॲपचीही मदत घेतात, जे पूर्णपणे खोटे असतात. याशिवाय, अनेक प्रकरणांमध्ये, फिशिंग लिंकद्वारे डिव्हाइसवर मालवेअर स्थापित केले जातात आणि नंतर डिव्हाइसची सर्व माहिती चोरली जाते. केवायसी फसवणूक रोखण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल, मेसेज किंवा ईमेलवर दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नका, मग तो बँक अधिकारी किंवा सरकारी एजन्सी असल्याचा दावा करत असेल.
जर कोणी कॉल, मेसेज आणि ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती देण्याची मागणी करत असेल तर प्रथम अधिकृत ठिकाणाहून त्याची पडताळणी करा.
अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेजद्वारे कोणी तुम्हाला कोणतेही ॲप किंवा वेबसाइट उघडण्यास सांगितले तर त्यावर क्लिक करू नका. कोणतेही सार्वजनिक वायफाय वापरणे टाळा आणि नेहमी सुरक्षित इंटरनेट वापरा. जेणेकरून उपकरणाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही.