
Maharashtra Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; 27 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी होणार प्रसिद्ध
कराड : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी (दि. १६) जानेवारीपासून सुरू होणार असून, दररोज दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल, तर २३ ते २७ जानेवारी या कालावधीत अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे. २७ जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
येथील प्रशासकीय कार्यालयात निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपस्थित होते. या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. ५) रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर शनिवारी (दि. ७) फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात केली जाणार आहे. कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघात जिल्हा परिषदेचे १२ गट आणि पंचायत समितीचे २४ गण असून, एकूण ४८६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.
हेदेखील वाचा : Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप
आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला आहे. शासकीय ठिकाणांवरील ५१७ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील २५१३ फलक, कोनशिला व झेंडे काढून टाकण्यात किंवा झाकण्यात आले आहेत. खासगी जागांवरील जाहिराती हटवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ३३ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तपासणीत आढळले १४४९७ दुबार मतदार
मतदार यादीच्या तपासणीत १४४९७ दुबार मतदार आढळून आले असून, त्यांच्याकडून परिशिष्ट ‘एक’ भरून घेण्यात येत आहे. अशा मतदारांच्या नावांवर विशेष शिक्के मारण्यात आले आहेत. तसेच ७८२९ मयत मतदारांची नावे यादीतून वेगळी करण्यात आली आहेत. जिल्हा परिषद उमेदवारांसाठी खर्चाची कमाल मर्यादा ७ लाख ५० हजार रुपये, तर पंचायत समिती सदस्यांसाठी ५ लाख २५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ३ फेब्रुवारी रात्री १२ वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा असेल.
12 जिल्हा परिषद गटांमध्ये 4.66 लाख मतदार
पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, वारुंजी, सुपने, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले आणि येळगाव या १२ जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण ४ लाख ६६ हजार ६०६ मतदार आहेत. त्यामध्ये २ लाख ६ हजार ४५९ पुरुष आणि २ लाख ६० हजार १३४ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक यंत्रणा पूर्णतः सज्ज असून शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्याचा प्रशासनाचा निर्धार असल्याचेही प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.
हेदेखील वाचा : BMC Exit Polls 2026: मुंबईत ‘ठाकरी’ बाणा संपणार? भाजपा-शिवसेनेला 138 तर ठाकरेंना केवळ…, राजकारणात खळबळ