ajit pawar statement on ncp sharad pawar political news
नाशिक : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका बसला आहे. महायुतीला एकतर्फी यश मिळाल्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना पक्ष खरा कोणाचा याचे उत्तर मिळाले असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर आता अजित पवार गटातील बड्या नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आल आहे. शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार असल्याचे म्हटल्यामुळे सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील काही नेत्यांमध्ये नेहमी शाब्दिक वादंग होताना दिसत असतो. अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी चुरशीची लढाई निवडणुकीच्या प्रचारावेळी देखील दिसून आली. मंत्री नरहरी झिरवाळ हे सध्या अजित पवार गटामध्ये आहेत. मात्र शरद पवार यांच्याबाबत त्यांची निष्ठा अजिबात कमी झालेली नसल्याचे दिसून आले आहे. नरहरी झिरवाळ यांनी अनेकदा शरद पवारांबाबत सूचक वक्तव्य केले आहेत. आता पुन्हा एकदा झिरवाळ यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा होत आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले नरहरी झिरवाळ?
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, “माझी मागणी एकच आहे. प्रत्येक माणूस तीच मागणी करतोय, विरोदक असो की राष्ट्रवादीचा कुणीही माणूस असो. सगळ्यांना वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजे. राजकारणात काही गोष्ट घडून गेली. आम्ही पवार साहेबांना सोडून गेलो. मात्र लोकांनी आम्हाला निवडून दिलं,” असे मत झिरवाळ म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पाडुंरंगाच्या शेजारी पवारसाहेबांना पाहतो. साहेब निश्चित विचार करतील. राजकारणात त्याचा वापरही केला गेला. पहाटे शपथ झाली तेव्हा मी दिल्लीला पळून गेल्याची माझ्यावर टीका झाली. बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसले होते. माझी छाती फाडली तर शरद पवार साहेबच दिसतील, असं सांगतानाच मी ज्या दिवशी अजितदादांसोबत गेलो, त्यानंतर शरद पवार यांच्यासमोर गेलो नाही. कोणत्या तोंडाने मी साहेबांपुढे जाऊ? मी साहेबांना प्रभू रामाच्या जवळचं स्थान देतो. प्रभू रामचंद्राच नाव घेऊन मी साहेबांना फसवलं. मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं, याच मूल्यांकन मीच करू शकतो. आता पवारसाहेबांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार. आमच्या सारख्या अनेकांचं अवघड झालं आहे. साहेब विचार करतीलच ना?,” असे मत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी अजित पवार व शरद पवार एकत्र यावे असे साकडे घातले असल्याचे सांगितले. आशाताई पवार म्हणाल्या की, “हे वर्ष सगळ्यांना उत्तम आणि चांगलं जाऊदेत असं साकडं पांडुरंगाला मी घातलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊदेत असंही सांगितलं आहे. मला वाटतं की वर्षभरात हे दोघं एकत्र येतील. सगळ्यांना हे वर्ष सुखाचं, समाधानाचं जाऊदेत असंही साकडं मी घातलं आहे असंही आशाताई पवार यांनी म्हटलं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून मी प्रार्थना केली. पांडुरंग माझं ऐकणार असा विश्वास वाटतो असंही आशाताई पवार म्हणाल्या. आशाताई पवार यांनी अजित पवार व शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे.