नववर्षाच्या सुरुवातीला आशाताई पवार यांनी पंढरपूरला जाऊन विठूरायाचे दर्शन घेतले (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर : राज्यामध्ये मागील दोन ते तीन वर्षांमध्ये अनेक राजकीय स्फोट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला. अजित पवार यांनी वेगळा विचार करुन महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार वेगळे झाल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडली. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह व नाव दिले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ झाली आहे. यानंतर आता अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सूचक वक्तव्य केली आहेत.
नवीन वर्षांच्या मुहूर्तावर राज्यातील तीर्थक्षेत्राला मोठी गर्दी होत आहे. अनेकजण विठूरायाच्या चरणी लीन झाले आहेत. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी देखील विठूरायाचे दर्शन घेतले. तसेच विठूराया चरणी साकडं देखील घातलं आहे. आशाताई पवार यांनी दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद देखील साधला. यावेळी त्यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावं यासाठी साकडं घातलं असल्याचे सांगितले आहे. तसेच या नवीन वर्षामध्ये अजित पवार व शरद पवार एकत्र येतील असे सूचक विधान देखील आशाताई पवार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या आशाताई पवार?
पंढरपूरमध्ये दर्शन घेतल्यानंतर आशाताई पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, हे वर्ष सगळ्यांना उत्तम आणि चांगलं जाऊदेत असं साकडं पांडुरंगाला मी घातलं आहे. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येऊदेत असंही सांगितलं आहे. मला वाटतं की वर्षभरात हे दोघं एकत्र येतील. सगळ्यांना हे वर्ष सुखाचं, समाधानाचं जाऊदेत असंही साकडं मी घातलं आहे असंही आशाताई पवार यांनी म्हटलं. शरद पवार आणि अजित पवार एकत्र यावेत म्हणून मी प्रार्थना केली. पांडुरंग माझं ऐकणार असा विश्वास वाटतो असंही आशाताई पवार म्हणाल्या. आशाताई पवार यांनी अजित पवार व शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकीय भूमिकेचे पवार कुटुंबामध्ये पडसाद
अजित पवार यांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचे पडसाद पवार कुटुंबामध्ये देखील दिसून आले. लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. त्यामुळे पवार कुटुंबामध्येच लोकसभेची लढत झाली. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना संधी दिली. त्यामुळे विधानसभा निवडणूक देखील पवार कुटुंबामध्येच झालेली दिसून आली. यामुळे आता शरद पवार व अजित पवार हे नव्या 2025 वर्षामध्ये एकत्रित येणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.