
Pune Politics : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाही अद्याप उमेदवाऱ्या निश्चित न झाल्याने इच्छुकांची चांगलीच घालमेल होतानाचे चित्र दिसून येते. त्यातच, मुंबई आणि पुण्यातील महापालिका निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई आणि पुण्यात इच्छुक नाराज उमेदवारांकडून ऐनवेळी पक्षांतर केले जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकूडन काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आला. काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. दत्ता बहिरट हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दत्ता बहिरट यांनी लढवली काँग्रेसकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
तसेच काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हेही अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले. अजित पवारांच्या जिजाई या निवासस्थानी दोन्ही नेते पोहोचले असून, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जागावाटप आणि उमेदवारांबाबत त्यांची चर्चा झाली.
प्रशांत जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून, प्रभाग क्रमांक १८ मधून त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. प्रशांत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
ठाण्यात अजित पवार गट स्वबळावरच
ठाणे महापालिकेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी येथे किमान ८० जागा लढवणार, अशी सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार अशी शक्यता होती, तशी इच्छादेखील व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे, अखेर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर निवडणुकीकडे सामोरे जाणार आहे.
हेदेखील वाचा : BMC Election : भाजप-सेनेचे अखेर ठरलं ! जागावाटपावर दोन्ही पक्षांत एकमत, भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार