Assembly Deputy Speaker Anna Bansode celebrates her birthday with criminal Akya Bond
पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी नेतेच गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी नेत्यांचे गुन्हेगारांसोबत फोटोशूट तसेच बर्ड थे सिलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व मंत्री आण्णा बनसोडे यांनी गुन्हेगारांसोबत फोटो काढले आहेत. हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांनी यापूर्वीच पक्षातील नेत्यांना फोटो काढताना आणि सत्कार स्वीकारताना काळजी घेण्याचे सांगितले होते. यानंतर देखील अजित पवार गटाचे नेते व विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी गुन्हेगारासोबत वाढदिवस साजरा केला आहे. आण्णा बनसोडे यांना गुंड आकाश उर्फ आक्या बॉण्ड उर्फ सुमित मोहोळ याने थेट केक भरवला आहे. याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. गुन्हेगारी क्षेत्रात उतरलेल्या आक्या बॉण्डला बनसोडेंनी स्वतःच्या बर्थडे निमित्त केक भरवला आहे. सुमित मोहोळ हा अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पिंपरीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या फोटोची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. विधानसभा उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आण्णा बनसोडेंचा पहिला वाढदिवस साजरा होत होता. त्याचवेळी गुंड आक्या बॉण्डची एन्ट्री झाली. साहेब असा उल्लेख असलेला केक आणि बुके घेऊन तो आला. आक्या बॉण्डच्या उजव्या बाजूला बनसोडे आणि डाव्या बाजूला मुलगा सिद्धार्थ उभे राहिले. मग उपाध्यक्ष बनसोडेंनी केक कापला. बनसोडे आणि आक्याबॉण्डने एकमेकांना केक ही भरवला, याची रील सोशल मीडियावर ही पोस्ट करण्यात आली आणि ही बाब उजेडात आली. यानंतर आता अजित पवार काय भूमिका घेणार याची चर्चा सुरु आहे.
हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण?
यापूर्वी देखील बीडमधील कुख्यात गुंड वाल्मिक कराड आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामधील जवळीकमुळे राष्ट्रवादीला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाताली आरोपी वाल्मिक कराड याचे धनंजय मुंडेंसोबत संबंध असल्यामुळे मुंडेंना पालकमंत्रिपद नाकारण्यात आले. त्याचबरोबर त्यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. यानंतर आता विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी गुन्हेगारासोबत वाढदिवस साजरा केल्याने हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण असल्याची टीका केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कोण आहे सुमित मोहोळ?
मीडिया रिपोर्टनुसार, सुमित मोहोळ उर्फ आक्या बॉण्डने अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकलं आहे, आजवर त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली होती. आण्णा बनसोडेंचा वाढदिवस आक्या बॉण्ड याने साजरा केल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे. यापूर्वी अजित पवार यांनी आण्णा बनसोडे आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ यांना चांगल्या शब्दांत समजावले होते.