सौजन्य - नवराष्ट्र टीम
मंचर : सध्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून, डिंभे धरणातील पाणीसाठा केवळ १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मी स्वतः पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मीना शाखा व घोड शाखेला पाणी सोडण्याबाबत विनंतीचे पत्र दिले असून, लवकरच या कालव्यांना पाणी सोडले जाईल, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शरद सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, युवा नेते राजेंद्र गावडे, माजी सभापती प्रकाश घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले की, “कुकडी प्रकल्पातील आकडेवारीनुसार, एक आवर्तन शेती व पिण्यासाठी सोडता येईल. सोमवार, ५ मे रोजी अहिल्यानगर येथे पाटबंधारे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे आणि मी स्वतः त्या बैठकीस उपस्थित राहणार आहे.” ते पुढे म्हणाले, “या वर्षी पावसाबाबत अनिश्चितता असल्याने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा आहे. शेतीसह पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली असून, अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे.”
गावोगावी पाणी टंचाई होण्याची शक्यता
वळसे पाटील यांनी स्पष्ट केले की, “मी आंबेगाव तालुक्याच्या जनतेसोबत आहे आणि कुकडीचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, हाच माझा प्रयत्न आहे.” तसेच, पाणीटंचाई गंभीर होत गेल्यास भविष्यात गावोगावी पाण्यावरून संघर्षाचे प्रसंग ओढवू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
मला स्टंट करण्याची गरज नाही : वळसे पाटील
डिंभे डाव्या कालव्यातून घोड शाखेला गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडले जात नसल्यामुळे काही राजकीय नेत्यांनी कळंब येथे आंदोलन केले होते. या संदर्भात विचारले असता वळसे पाटील म्हणाले, “फोकसमध्ये राहण्यासाठी काहीतरी स्टंट करणं मला आवडत नाही.”