
बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस 'अॅक्शन मोड'वर; 'या' बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी
पाटणा : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वीच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले. यामध्ये काँग्रेसला म्हणावे तसे यश मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर, बिहार काँग्रेसने पक्षाविरुद्ध कृती करणाऱ्या नेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पक्षविरोधी कारवायांसाठी सात नेत्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाच्या मूलभूत तत्त्वांबाबत, शिस्त आणि संघटनात्मक शिष्टाचाराबाबत हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल आणि पक्षाच्या व्यासपीठाबाहेर वारंवार अवांछित आणि दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल राज्य काँग्रेस शिस्तपालन समितीने ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष कपिलदेव प्रसाद यादव यांनी हा आदेश जारी केला. त्यांनी सांगितले की, संबंधित नेत्यांकडून मिळालेले स्पष्टीकरण समितीला असमाधानकारक वाटले. त्यांची कृती पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन करण्याच्या पाचपैकी तीन निकषांमध्ये स्पष्टपणे येते.
हेदेखील वाचा : Bihar Politics: बिहारमध्ये गृहमंत्रालय भाजपकडे; आता विधानसभा अध्यक्षपदासाठीही चढाओढ
तसेच समितीने असे नमूद केले की, नेत्यांनी पक्षाच्या व्यासपीठाबाहेर काँग्रेसच्या कार्यक्रमांविरुद्ध आणि निर्णयांविरुद्ध सातत्याने विधाने केली, सक्षम अधिकाऱ्यांच्या सूचना जाणूनबुजून दुर्लक्ष केल्या आणि प्रिंट आणि सोशल मीडियामध्ये तिकीट खरेदीसारखे निराधार आणि दिशाभूल करणारे आरोप करून पक्षाच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान पोहोचवले.
काँग्रेसकडून 43 नेत्यांना नोटिसा
पक्षाने ४३ नेत्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांना समितीला लेखी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर पक्ष कार्यालयात निदर्शने करण्यात आली. आता, पक्षाने सात नेत्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजीच बिहार महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सरवत जहाँ यांनी राजीनामा दिला.
कर्नाटकात राजकारण तापले
दुसरीकडे, कर्नाटकात राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून राजकारण तापले आहे. कर्नाटक कॉँग्रेसमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डि. के. शिवकुमार यांच्यात स्पर्धा सुरू आहे. अडीच वर्षानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान पुढील 48 तास कॉँग्रेससाठी अंतर्गतरित्या महत्वाचे समजले जात आहेत. मात्र, या स्थितीचा भाजप फायदा घेते का हे पाहावे लागणार आहे.