Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 06.11.2026
Maharashtra to World Breaking News :
मुंबईच्या कस्टम्स विभागाकडून बँकॉकवरून आलेल्या प्रवाशाकडून ३.७२ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक गांजा (Weed) जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे पुण्यातील सिंहगड रोड परिसरात मध्यरात्री अज्ञात तरुणांकडून गाड्यांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापुरात गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि सतेज पाटील गटात राजकीय संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्यानेे कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ज्येष्ठ नेत शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीची चौकशी फाईल कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण; अमेरिकन निवडणुकीनंतर ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल ९४.६६ डॉलरवर आले आहेत. युरोपमध्ये आयरलँडहून रोमला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्याने विमानाचे फ्रान्समध्ये आपत्कालीन लँडिंग करावी लागली. भारतीय वंशाच्या नित्या व्ही. रमन यांची लॉस एंजिलीसच्या पहिल्या दक्षिण आशियाई महिला महापौर म्हणून निवड करण्यात आळी आहे. SAFF चॅम्पियनशिप २०२६ च्या पहिल्याच सामन्यात भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानवर ३-० अशी मजबूत आघाडी घेतली.
06 Nov 2026 09:10 AM (IST)
गेल्या ६१ तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (किणी टोलनाक्याजवळ) सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर किणी टोलनाक्यावर याविषयीची अधिकृत आणि मोठी घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीत साखर कारखानादारांनी दिलेला सुधारित ऊस दराचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य केल्यामुळे हा ६१ तासांचा पेच सुटला आहे.
06 Nov 2026 09:00 AM (IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नवी दिल्लीतील प्रदूषणाची गंभीर स्थिती आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेतील पहिला सामना आता दिल्ली ऐवजी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे खेळवला जाणार आहे. डिसेंबर महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका रंगणार असून, मालिकेची सुरुवात १३ डिसेंबरपासून होणार आहे.
06 Nov 2026 08:50 AM (IST)
Nashik TCS Conversion Case : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत घडलेल्या बहुचर्चित महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. या खळबळजनक प्रकरणाच्या तपासात एमआयएम (MIM) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचे नाव समोर आले असून, त्यांच्याविरोधातही आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
06 Nov 2026 08:40 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू असतानाच राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला असून, यामध्ये "१० तारखेनंतर एकत्र बसून सविस्तर चर्चा करू" असे शरद पवारांनी प्रफुल पटेल यांना सांगितल्याने आगामी काळात कोणत्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी होणार, याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.
06 Nov 2026 08:30 AM (IST)
Gold Rate Today: 6 नोव्हेंबर रोजी आज संपूर्ण देशात धनत्रयोदशीचा उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या मुहूर्तावर तुम्ही देखील सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे भाव जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.






