bjp amit shah in maharashtra for vidhansabha elections 2024
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून जागावाटपाची तयारी सुरु आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सध्या भाजप पक्षश्रेष्ठी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसीय या दौऱ्यामध्ये अमित शाह महायुतीच्या जागांचा गुंता सोडवणार आहेत. मुंबईमध्ये अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बंद दाराआड चर्चा होणार आहे. त्यामुळे महायुतीसाठी अमित शाह यांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर महायुतीला जोरदार फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणूकीची मोठी तयारी सुरु करण्यात आली आहे. योजनांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात दाखवल्या जात असून लाडकी बहीणीवर जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती म्हणून पहिल्यांदाच भाजप, अजित पवार व शिंदे गट हे विधानसभा निवडणूका लढणार आहेत. त्यामुळे काही जागांबाबत महायुतीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. महायुतीमध्ये भाजप पक्षच मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा गुंता सोडवण्यासाठी अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावेळी अमित शाह यांनी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी भेट दिली.
हे देखील वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द ; ऐनवेळी नेमका का निर्णय बदलला?
अमित शाह यांनी मुंबईमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी संवाद देखील साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्यव साधण्याचा प्रयत्न केला. आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण? असा सवाल अमित शाह यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे. तसेच कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ तिन्ही एकच चिन्ह मानून काम केलं पाहिजे,तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त जागा जिंकून आल्या तर सरकार स्थापन होणं शक्य आहे. अशा सूचना देखील अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. अमित शाह यांची आज (दि.26) पुन्हा एकदा महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत रात्रीच्या वेळी बैठक होणार आहे. महायुतीमध्ये 198 जागांवर एकमत झालेलं आहे. मात्र उर्वरित 90 जागांवर आज अमित शाह यांच्यासोबत मुंबईमध्ये चर्चा होणार आहे.
पुन्हा येणार महाराष्ट्र दौऱ्यावर
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवलड्यामध्ये अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. येत्या 1 ऑक्टोबर रोजी अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर पुन्हा एकदा येणार आहेत. यावेळी देखील ते निवडणूकीचा आढावा घेणार आहेत. मुंबई, ठाणे, कोकण विधानसभा मतदारसंघाचा आढावा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये अमित शाह घेणार आहेत. त्यांच्या या बैठकीनंतरच मुंबई, ठाणे व कोकण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरणार आहेत. त्यामुळे भाजपची पहिली यादी ही नवरात्रीमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून मोठी तयारी केली जात असून पक्षश्रेष्ठी स्वतः लक्ष घालत आहेत.