
भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी (फोटो सौजन्य-ChatGPT)
या फेरबदलात महाराष्ट्रातील चार नेत्यांना इतर राज्यांमध्ये महत्त्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. आगामी 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तावडे यांच्याकडे ही जबाबदारी आली असून ते याआधीपासून राज्यात संघटनात्मक बैठकांमध्ये सक्रिय आहेत.
Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत जगदीश पटेल, प्रदीप शर्मा आणि अनंत ओझा यांचीही सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर विनय सहस्रबुद्धे यांची दिल्ली भाजपच्या प्रभारीपदी, तर महाराष्ट्रातील माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोव्यात अनिल अँटनी हे सहप्रभारी असतील.
महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी राज्यसभा खासदार बैजयंत जय पांडा यांच्याकडे देण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी अमित मालवीय, सदानंद शेट तानावडे आणि कमलजीत सहरावत यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या फेरबदलात स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांचे प्रभारीपद देण्यात आले आहे. हरीश द्विवेदी यांच्याकडे बिहार आणि कर्नाटक, तर राम माधव यांच्याकडे तामिळनाडू आणि उत्तराखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील बन्सल यांना तेलंगणा आणि पश्चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे.
तरुण चुग यांच्याकडे गुजरात, श्रीकांत शर्मा यांच्याकडे हिमाचल प्रदेश, सतीश पूनिया यांच्याकडे जम्मू-काश्मीर आणि पंजाब, तर डी. पुरंदेश्वरी यांच्याकडे ओडिशाची जबाबदारी देण्यात आली आहे.
विशेषतः उत्तर प्रदेशात 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने तेथील संघटनात्मक तयारी आधीपासून सुरू आहे. विनोद तावडे यांनी सप्टेंबरमध्ये लखनऊ, गोरखपूरसह विविध भागांत बैठका घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे नव्या नियुक्त्यांकडे आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या संदर्भातही पाहिले जात आहे.